पुणे : पुण्यातील सकल हिंदू समाजाच्या मोर्चादरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुण्यातील एफसी रोडवरील काही व्यापाऱ्यांवर गंभीर आरोप केले. त्यांनी दावा केला की, काही व्यापारी ‘लव्ह जिहाद’च्या पद्धतीने मुलींना फसवत आहेत. विशेषत: पाचशे रुपयांत दोन शर्ट विकून मुलींचे संपर्क क्रमांक मिळवले जातात आणि त्यांना आमिष दाखवून फसवले जाते, असा आरोप त्यांनी केला. या आरोपांनी परिसरात खळबळ उडाली आहे.
पडळकर यांनी एफसी रोडवरील काही व्यावसायिकांवर थेट बोट ठेवत, त्यांचे कृत्य ‘लव्ह जिहाद’चे स्वरूप असल्याचा दावा केला. त्यांच्या मते, या व्यापाऱ्यांकडून मुलींना लक्ष्य केले जात असून, त्यांचा गैरफायदा घेतला जात आहे. या आरोपांमुळे एफसी रोडवरील व्यापारी समुदायात अस्वस्थता पसरली आहे, तर सामान्य नागरिकांमध्येही याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
एफसी रोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शाम मारणे यांनी पडळकर यांच्या आरोपांना कठोरपणे खंडन केले. ते म्हणाले, “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे व्यवसाय करत आहोत. रात्री उशिरापर्यंत काही अनव्हेरिफाइड व्यापारी येत असतील, परंतु त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती नाही. पडळकरांनी अशा घटनांचे पुरावे आमच्यासमोर ठेवावेत, आम्ही खबरदारी घेऊ.” त्यांनी ‘लव्ह जिहाद’सारख्या कृत्यांना सहानुभूती नसल्याचे स्पष्ट केले आणि अशा कोणत्याही घटनेची त्यांना माहिती नसल्याचे सांगितले. तसेच, पोलिसांकडेही यासंदर्भात कोणतीही तक्रार नसल्याचे त्यांनी नमूद केले.
यापूर्वीही एफसी रोडवर बांगलादेशी किंवा रोहिंग्या नागरिकांच्या वावराबाबत आरोप झाले होते, परंतु पोलीस तपासात ते निराधार ठरले होते, असे मारणे यांनी सांगितले. या नव्या वादामुळे एफसी रोड पुन्हा चर्चेत आला आहे. प्रशासनाने या प्रकरणात अधिकृत तपास करून स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
-हिंजवडी आयटी पार्कमधील वीजपुरवठा पुन्हा सुरळीत
-राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता तुकडेबंदी कायदा रद्द
-‘हे पाणी पिलं नाहीस अन् धर्म स्वीकारला नाहीस, तर…’ १९ वर्षीय विवाहितेवर धर्मांतरासाठी दबाव
-आता पिंपरी चिंचवडमध्ये पार्किंगची कटकट होणार कमी; ‘व्हॉट्सअॅप’वरुन करता येणार पार्किंग नोंदणी