पुणे : महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता आणि जबाबदारी वाढवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ड्युटी वेळेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या नवीन नियमांनुसार, सर्व अधिकाऱ्यांना सकाळी ९ वाजता कार्यालयात हजर राहणे अनिवार्य आहे. तसेच, संध्याकाळी कर्मचारी सुटण्यापूर्वी पाऊण तास आधी अधिकाऱ्यांची सुटी होईल. याशिवाय, दुपारच्या जेवणाच्या वेळेतही बदल करण्यात आले आहेत. कार्यालयीन सेवक तसेच कनिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या जबाबदारीत वाढ करताना नवल किशोर राम यांनी उशिरा येणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही दिले आहेत.
पूर्वी अभियंता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची ड्युटी वेळ सकाळी ९:४५ ते संध्याकाळी ६:३० होती, तर दुपारच्या जेवणाची सुट्टी दुपारी २:०० ते २:३० अशी होती. आता नवीन वेळापत्रकानुसार, अभियंता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची ड्युटी वेळ सकाळी ९:०० ते संध्याकाळी ५:४५ अशी आहे, आणि भोजनाची वेळ दुपारी १:०० ते २:३० अशी वाढवण्यात आली आहे. क्षेत्रीय अधिकारी आणि विभागीय निरीक्षकांसाठीही हेच वेळापत्रक लागू आहे. प्रशासकीय कर्मचाऱ्यांची ड्युटी वेळ सकाळी ९:४५ ते ६:१५, तर भोजनाची वेळ दुपारी २:०० ते २:३० अशी आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ड्युटी वेळ सकाळी ९:३० ते ६:३० निश्चित करण्यात आली आहे.
सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या वेळेत ड्युटीवर हजर राहणे बंधनकारक आहे. जेवणाच्या वेळेनंतर कार्यस्थळी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. कार्यालयीन कामकाजाव्यतिरिक्त फिरती किंवा स्थळभेटीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडण्याची वेळ, स्थळभेटीचे ठिकाण आणि वेळ यांच्या नोंदी ठेवणे बंधनकारक आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या नोंदींची तपासणी करावी लागेल.
खातेप्रमुखांनी दररोज संध्याकाळी उपस्थितीचा अहवाल आणि स्थळ पाहणीच्या संक्षिप्त नोंदी आयुक्त कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. नियमितपणे विलंबाने येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई केली जाईल, असे नवल किशोरराम यांनी स्पष्ट केले आहे. या बदलांमुळे महापालिकेच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि शिस्त येण्याची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
-आमदार रासनेंच्या मागणीला यश; गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सवाचा दर्जा
-पुण्यातील एफसी रोडवरील वाद: पडळकरांचे आरोप, व्यापाऱ्यांचे प्रत्युत्तर
-हिंजवडी आयटी पार्कमधील वीजपुरवठा पुन्हा सुरळीत
-राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता तुकडेबंदी कायदा रद्द