पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पुणे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुरंदर तालुक्याचे माजी आमदार आणि काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. १६ जुलै रोजी पुरंदर येथे मोठ्या मेळाव्यात ते भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत.
यापूर्वी माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये, तर कसबा पेठ मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशामुळे पुरंदर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याने ‘मिशन लोटस’ जोर धरू शकते, अशी चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर संजय जगताप काँग्रेसमध्ये नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यांचा थोपटे यांच्यासोबत भाजप प्रवेशाचा मार्ग आखला गेला होता, परंतु स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधामुळे तो लांबणीवर पडला होता. आता मात्र त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. पुरंदर तालुक्यात जगताप कुटुंबाचा काँग्रेसवर मजबूत प्रभाव आहे. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो.
दुसरीकडे, भाजपसाठी ही संधी पुरंदरमधील आपली पकड मजबूत करण्यासह बारामती लोकसभा मतदारसंघात प्रभाव वाढवण्याची आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये जगताप यांच्या स्थानिक प्रभावाचा भाजपला फायदा होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या
-ढोल-ताशा पथकांसाठी आनंदाची बातमी; पुणे पोलिसांनी जाहीर केला ‘हा’ मोठा निर्णय
-धक्कादायक! नवऱ्याला त्रिशूळ मारला पण लागला ११ महिन्यांच्या चिमुकल्याला, पोलिसांना वेगळाच संशय
-हिंजवडी आयटी पार्कच्या पायाभूत सुविधांसाठी सरकारचा ॲक्शन प्लॅन, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय ठरलं?
-पुणे महापालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांना लागणार शिस्त; आयुक्तांनी जारी केलं नवं वेळापत्रक