पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल पुणे दौऱ्यात अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. मात्र, त्यांच्या या दौऱ्यापेक्षा शहरात पसरलेल्या एका अफवेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या अफवेने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला. काल मुख्यमंत्री यशदा येथील पुणे महानगर ग्रोथ हबच्या बैठकीनंतर कोथरूडला जाणार होते, असं त्यांच्या नियोजित वेळापत्रकात नमूद होतं.
बैठकीनंतर त्यांचा ताफा गणेशखिंड रोडने मार्गस्थ झाला. पण अचानक ताफ्याने मार्ग बदलला आणि इस्कॉन मंदिरापासून मॉडेल कॉलनीकडे वळला. या मार्गावर पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांचे निवासस्थान आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
यामागील कारण होते गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात सुरू असलेली प्रभाग रचनेची चर्चा. फडणवीसांचा ताफा थेट आयुक्तांच्या निवासस्थानाकडे निघाल्याची अफवा पसरली आणि महापालिका निवडणुकीच्या तयारीत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला. काहींना वाटलं की मुख्यमंत्री प्रभाग रचनेत हस्तक्षेप करणार आहेत. विरोधी पक्षांमध्ये तर इतकी धास्ती निर्माण झाली की काही कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या निवासस्थानाच्या परिसरात धडकले.
पण काही वेळातच सत्य समोर आलं. प्रत्यक्षात मुख्यमंत्री फडणवीस मॉडेल कॉलनीतील लकाकी तलावासमोरील एका बड्या उद्योगपतीच्या घरी भेटीसाठी गेले होते. तिथे काही वेळ थांबून ते कोथरूडला रवाना झाले. जर फडणवीस खरंच आयुक्तांना भेटायला गेले असते, तर विरोधकांना टीकेची संधी मिळाली असती. पण सत्य समोर आल्यावर कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.
महत्वाच्या बातम्या
-पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
-ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
-पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?