पुणे : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यात वैष्णवी हगवणे यांच्या आई-वडिलांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि महिलांच्या समस्यांसाठी कशा पद्धतीने काम व्हायला हवे, यावर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, न्याय व्यवस्थेकडे पोहोचताना पोलिस स्टेशन, कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा आणि महिलांच्या निर्वाहासाठीच्या योजनांसारखे अनेक पैलू आहेत. या सर्व बाबींचा विचार करून प्रभावी कारवाई होणे आवश्यक आहे.
नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले की, जर राज्य महिला आयोगाने पोलिसांना योग्य सूचना दिल्या असत्या आणि मयुरी जगताप यांच्या प्रकरणात कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली असती, तर मयुरीला त्यांच्या मालमत्तेतील वाटा मिळाला असता. त्या म्हणाल्या की, पोलिसांनी जबाबदारी न घेतल्याने दोषारोपणाचा खेळ सुरू होतो, परंतु यापेक्षा पीडित महिलांची कायदेशीर साक्षरता वाढवणे महत्त्वाचे आहे. यासाठी माध्यमे, महिला संघटना आणि सर्वांनी एकत्र येऊन पीडित महिलांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, असे नीलम गोऱ्हे आवाहन केले.
गोऱ्हे यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही भाष्य केले. त्या म्हणाल्या की, वरिष्ठ स्तरावरील अधिकारी कार्यक्षम असले तरी काही पोलिस स्टेशन स्तरावर संवेदनशीलतेचा अभाव दिसतो. नाशिकमधील एका मुलीच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा दाखला देताना त्या म्हणाल्या की, तिथल्या पोलिसांनी तक्रार नोंदवली, परंतु आरोपी फरार असल्याने कारवाईचा अर्थ काय? याबाबत त्यांनी नाशिकच्या पोलिस आयुक्तांना निर्देश दिले. तसेच, संपूर्ण पोलिस दलावर टीका करून त्यांचे मनोबल खच्चीकरण करू नये, असेही त्या म्हणाल्या.
काही पोलिस स्टेशनांवर आर्थिकदृष्ट्या प्रभावशाली व्यक्तींचे वर्चस्व असल्याच्या तक्रारी असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस अधिकारी सोडले तर काही ठिकाणी ही परिस्थिती दिसून येते, असे त्यांनी नमूद केले. पोलिस स्टेशन स्तरावर संवेदनशीलता आणि कार्यक्षमता वाढवण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या सर्व मुद्द्यांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि पोलिस यंत्रणेची जबाबदारी यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
-‘निवडणूक आल्या की कोरोना कुठून तरी बाहेर निघतोय’; वसंत मोरेंना नेमकं काय म्हणायचं?
-फसवणुकीचा ‘गुजरात पॅटर्न’, पुणे पोलिसांनी केला पर्दाफाश; अमेरिकन नागरिकांना घातला जात होता गंडा
-खासदार मुरलीधर मोहोळ घेणार कसब्यात जनता दरबार, नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
-वैष्णवीला दिलेले 51 तोळे स्त्री धन कुठे गेलं? धक्कादायक माहिती समोर