पुणे : पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून 20 ते 25 लाख रुपयांचे साहित्य गहाळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये प्राचीन काळातील पितळी दिवे, झुंबर, चार एसी, किचन टॉप युनिट, डायनिंग टेबल, दोन एलईडी टीव्ही यासह अनेक मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी महापालिका प्रशासनाने कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. उलट, या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत नवीन साहित्य खरेदी केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, काही सामाजिक संस्थांनी या प्रकरणात लक्ष घातले असून, थेट सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.
पुणे महापालिका आयुक्तांचे शासकीय निवासस्थान मॉडेल कॉलनी येथे आहे. माजी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले मे महिन्यात निवृत्त झाले आणि जुलै महिन्यात त्यांनी बंगला सोडला. नवीन आयुक्त नवकिशोर राम येण्यापूर्वी भवन, विद्युत आणि सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंगल्याची पाहणी केली. त्यावेळी बंगल्यातील अनेक वस्तू गायब असल्याचे आढळले.
पितळी दिवे, झुंबर, चार एसी, 45 आणि 65 इंचांचे दोन एलईडी टीव्ही, रिमोट, रिमोट बेल्स, किचन टॉप, अॅक्वागार्ड, सोफा, कॉफी मशिन, वॉकीटॉकी सेट, खुर्च्या आणि आवारातील झाडे-फुलांच्या कुंड्या गहाळ असल्याचे निदर्शनास आले. या साहित्याचा ठावठिकाणा काय, याबाबत अधिकारी संभ्रमात होते. मात्र, याची तक्रार न करता प्रशासनाने नवीन साहित्य खरेदीचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची पालिकेत दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. तरीही कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.
त्यामुळे हे साहित्य नेमके कोणी नेले आणि प्रशासन तक्रार का टाळत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका आयुक्तांचा बंगला मॉडेल कॉलनीत अर्धा एकर परिसरात आहे. येथे सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आणि 24 तास सुरक्षारक्षक तैनात असतात. असे असतानाही साहित्य कसे गहाळ झाले, असा सवाल उपस्थित होत आहे. यापूर्वी 10 वर्षांपूर्वी महापौर बंगल्यातून टीव्ही चोरीला गेला होता, तेव्हा तक्रार दाखल झाली होती. मात्र, आता साहित्य गहाळ होऊनही चोराचा शोध लागलेला नाही.
महापालिकेच्या मालमत्तेचे व्यवस्थापन मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून केले जाते, तर बंगल्यातील खरेदी भवन विभागामार्फत होते. बंगला सोडताना किंवा नवीन अधिकारी येताना साहित्याची तपासणी करणे बंधनकारक आहे. मात्र, साहित्य गहाळ झाल्यावर जबाबदारी कोणाची, हा प्रश्न कायम आहे.
महत्वाच्या बातम्या
-कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट
-सोमेश्वर फाउंडेशन आयोजित ‘विनायकी विनायक निम्हण गौरव’ शिष्यवृत्ती प्रदान
-मोठी बातमी: नवीन प्रभाग रचना अन् ओबीसी आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची निवडणुकांना मंजुरी