पुणे : पुणे पोलिसांनी रविवारी पहाटे खराडी परिसरात एका कथित रेव्ह पार्टीवर छापा टाकला. या कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली. न्यायालयाने सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारावर करण्यात आली असून, सर्व कायदेशीर प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यात आल्या आहेत.
आज एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. खडसेंनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आणि तपासावर शंका उपस्थित केली. खडसे यांनी दावा केला की, त्यांच्या जावयावर पाळत ठेवली गेली होती आणि याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज त्यांच्याकडे पुरावा म्हणून आहे. तसेच, पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलमधून कौटुंबिक फोटो बाहेर पाठवल्याचा आरोपही त्यांनी केला.
खडसे यांनी पोलिसांवर आणखी एक गंभीर आरोप केला की, ही कारवाई योजनाबद्धरित्या त्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी करण्यात आली आहे. ते म्हणाले की, या प्रकरणात पोलिसांनी गैरव्यवहार केले असून, त्यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा विचार ते करत आहेत. त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली.
यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देत खडसे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. ‘खराडी येथे केलेल्या रेव्ह पार्टीवरील ही कारवाई अत्यंत पारदर्शकपणे आणि नियमानुसार करण्यात आली आहे. पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे फोटो किंवा व्हिडिओ लीक केले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, कारवाईदरम्यान कोणी बाहेरील व्यक्तींनी फोटो किंवा व्हिडिओ काढले असतील, तर त्यावर पोलिसांचे नियंत्रण नसल्याचेही ते म्हणाले आहे.
पोलिसांनी प्रसारमाध्यमांना या कारवाईची संपूर्ण माहिती दिली असून, कोणत्याही प्रकारच्या शंका उपस्थित करण्याचे कारण नसल्याचे आयुक्तांनी नमूद केले. खडसे यांनी केलेले सर्व दावे निराधार असल्याचे सांगत, पोलिसांनी आपली कारवाई गुप्त माहितीच्या आधारावर केल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. या प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू असून, पोलिस आपले कर्तव्य निष्पक्षपणे पार पाडत असल्याचा दावा त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
-पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
-रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
-पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
-अमली पदार्थ अन् विदेशी मद्य, पोलिसांच्या छाप्यात खडसेंच्या जावई जाळ्यात, नेमकं काय घडलं?
-अध्यक्षांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत महिलाराज; मोहोळांच्या गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य निर्णय