पुणे : बारामती येथे कार्यरत असलेल्या रेड बर्ड एव्हिएशन ट्रेनिंग अकॅडमीविरोधात आता नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. वाढते विमान अपघात, विद्यार्थ्यांची बेजबाबदार वर्तणूक, संस्थेच्या व्यवस्थापनातील ढिसाळपणा यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला आणि दैनंदिन जीवनाला धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस वैभव सोलणकर यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे तक्रार केली आहे.
गेल्या काही महिन्यात रेड बर्ड संस्थेच्या प्रशिक्षण विमानांचे एकापाठोपाठ एक अपघात घडले आहेत. हे अपघात केवळ प्रशिक्षणाचा भाग म्हणून स्वीकारता येत नाहीत. कारण अनेक वेळा हे अपघात नागरिक वस्त्यांच्या जवळ किंवा शेती परिसरात घडले आहेत. अपघातांचे नेमके कारण स्पष्ट करण्यात संस्थेकडून गंभीरता दिसून येत नाही. नागरिकांच्या मते, ही स्थिती अपुरी देखभाल, प्रशिक्षकांची कमतरता व विद्यार्थ्यांची अयोग्य तयारी या कारणांमुळे उद्भवत आहे.
संस्थेतील काही प्रशिक्षणार्थी पायलट्स सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन, उद्धटपणा व वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. स्थानिक दुकानांमध्ये आणि सार्वजनिक वाहतुकीच्या मार्गांवर हे विद्यार्थी गोंधळ, मोठमोठ्याने बोलणे, ध्वनीप्रदूषण आणि अरेरावी करत असल्याच्या तक्रारी वारंवार मिळत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसोबतच आता सामाजिक शिस्तही धोक्यात आली आहे.जोरात गाड्या चालवणं, ड्रिंक करून गोंधळ घालणे.
“देशभरात कार्यरत अशा सर्व पायलट ट्रेनिंग संस्थांसाठी केंद्र शासनाने कठोर व स्पष्ट सुरक्षा नियमावली तयार करावी.यामध्ये विमानांची देखभाल, प्रशिक्षकांची पात्रता, विद्यार्थ्यांची वर्तणूक, स्थानिक प्रशासनाशी संवाद, आणि अपघातग्रस्त प्रकरणांची चौकशी यांसाठी विशेष विभाग असावा”, अशी मागणी वैभव सोलणकर यांनी केली आहे.
भाजप युवा मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने वैभव सोलणकर यांनी नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर करून रेड बर्ड संस्थेविरुद्ध तात्काळ चौकशी व आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. यावेळी उपस्थित युवा मोर्चा तालुका अध्यक्ष जगदीश कोळेकर, भाजप नेते प्रमोद खराडे शहर अध्यक्ष विवेक साळुंके,युवा नेते संदीप केसकर,हिरामण लोंढे आदी युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
“रेड बर्डसारख्या पायलट प्रशिक्षण संस्थांवर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी. बारामतीसारख्या संवेदनशील भागामध्ये अशा संस्थांसाठी स्वतंत्र नियामक फ्रेमवर्क असणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणताही तडजोड स्वीकारला जाणार नाही”, वैभव सोलणकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…
-पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
-ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
-पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?