पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. सासरच्या स्वार्थी माणसांमुळे हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहेत. याप्रकरणी आता सासरा राजेंद्र हगवणे, पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे वैष्णवीला लग्नामध्ये माहेरच्यांकडून देण्यात आलेल्या ५१ तोळे स्त्रीधनाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वैष्णवीला 51 तोळे सोन्याच्या स्त्रीधनाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवीच्या लग्नात तिच्या वडिलांनी हुंडा म्हणून 51 तोळे सोने, फॉरच्युनर गाडी आणि चांदीची भांडी दिली होती. मात्र, या प्रकरणात असे समोर आले आहे की, हगवणे कुटुंबाने हे 51 तोळे सोने खासगी बँकेत तारण ठेवले होते. तसेच फॉरच्युनर गाडी आता पोलिसांनी जप्त केली आहे.
वैष्णवीचा सासरा आणि दिराला अटक
वैष्णवीने सासरच्या जाचाला कंटाळून स्वतःच्या आयुष्य संपवल्यानंतर पती, सासू व नंदेला अटक करण्यात आली होती. परंतु सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार झाले होते. फरार असताना निर्दयी राजेंद्र हगवणे मटन पार्टी केल्याच देखील पुढे आलं आहे. एवढंच नाही तर पोलिसांनी अटक केल्यानंतर केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप होतो का? हा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, नकारार्थी मान हलवत राजेंद्र हगवणे याने आपल्याला पश्चाताप नसल्याचं सांगितलं. दरम्यान, न्यायालयाने तपासासाठी दोघांना २८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.