पुणे : सांस्कृतिक तसेच विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये अनेक धक्कादायक घटना घडल्याचं वारंवार समोर येत आहे. आता शहरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीला लग्नाचे अमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवले. ती गर्भवती असल्याचं समजताच त्याने रबडीमधून गर्भपाताची गोळी टाकून तिचा गर्भपात घडवून आणल्याची घटना उघडकीस आली आहे. पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून या प्रकरणी आदर्श वाल्मिक मेश्राम या २८ वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी आणि आदर्श मेश्राम यांचे २०१८ पासून संबंध होते. दोघे कॉलेजमध्ये एकमेकांना ओळखत होते. त्या काळात आदर्शने तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. मात्र, जेव्हा पीडित तरुणी गर्भवती असल्याचे समजताच त्याने लग्नाला नकार दिला. पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, ३ जुलै २०२५ रोजी आदर्शचा वाढदिवस होता म्हणून ती यवतमाळहून पुण्यात आली. वाढदिवसाचं निमित्त म्हणून त्याने रबडी आणली होती. पण आदर्शने तिला फक्त रबडी नाही तर त्या रबडीमध्ये गर्भपाताच्या गोळ्या मिसळून तिला खायला दिली. पीडितेला याबाबत शंका देखील आली नव्हती. तिने रबडी खाल्ली अन् तिथेच त्यांच्या प्रेमाच्या निशाणीचा अंत झाला. काही वेळातच तरुणीचा गर्भपात झाला.
पीडित प्रेयसीने आदर्शच्या मोबाईलमध्ये त्याचे इतर मुलींशी असलेले संवाद पाहिले, त्यावरुन तिला आपली फसवणूक झाल्याचे समजले. तिने आदर्शच्या जुन्या प्रेयसीशी संपर्क साधला. त्यावेळी मिळालेल्या माहितीने तिला मोठा धक्काच बसला. आदर्शच्या जुन्या प्रेयसीसोबत देखील त्याने असेच कृत्य करत फसवणूक केली होती. आदर्शने लग्नाचे आमिष दाखवून तिचेही लैंगिक शोषण केल्याची माहिती त्या जुन्या प्रेयसीने दिली. या घटनेनंतर पीडितेने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आदर्शविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार), कलम ३१३ (महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात) आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. सध्या आरोपीचा तपास सुरू आहे. या प्रकरणाने पुणे शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे. प्रेमसंबंधाच्या नावाखाली फसवणूक आणि लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
-पुण्यातील एफसी रोडवरील वाद: पडळकरांचे आरोप, व्यापाऱ्यांचे प्रत्युत्तर
-हिंजवडी आयटी पार्कमधील वीजपुरवठा पुन्हा सुरळीत
-राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता तुकडेबंदी कायदा रद्द
-‘हे पाणी पिलं नाहीस अन् धर्म स्वीकारला नाहीस, तर…’ १९ वर्षीय विवाहितेवर धर्मांतरासाठी दबाव