पुणे : संपूर्ण राज्याला हादरुन सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात शशांकच्या मामाची एन्ट्री झाली आहे. आतपर्यंत या प्रकरणी सासरे राजेंद्र, सासू लता, दीर सुशील, नणंद करिश्मा आणि पती शशांकला अटक करण्यात आली आहे. काल न्यायालयात झालेल्या युक्तीवादात आरोपी हगवणेच्या वकिलांनी केलेले सर्व आरोप वैष्णवीच्या वडिलांनी फेटळून लावले आहेत. त्यातच आता येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचे नाव समोर आले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुपेकर यांच्या वादग्रस्त कारकीर्दीवर प्रकाश टाकत, त्यांच्याविरुद्ध ५०० कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी खटला सुरू असल्याचे पुराव्यासह उघड केले. तसेच, वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबीयांनी सुपेकर यांच्या नावाने धमकी देऊन कस्पटे कुटुंबीयांवर आणि पुणे पोलिसांवर दबाव टाकल्याचेही समोर आले आहे. यानंतर, सुपेकर यांच्यावर कारवाई करत त्यांच्याकडून अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे.
वैष्णवीच्या वडिलांनी आज पत्रकार परिषद घेऊन आरोपींच्या वकिलांकडून होणारे आरोप फेटाळून लावले. यावेळी त्यांनी सुपेकर हे वैष्णवीच्या मुलाचे मामा असल्याचे आणि मुलाच्या जन्मपत्रिकेत त्यांचे नाव मामा म्हणून नोंदवले असल्याचे स्पष्ट केले. यानंतर काही वेळातच सुपेकर यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आल्याचे समोर आले. ही कारवाई पोलिस वर्तुळात मोठी चर्चा बनली आहे.
जालिंदर सुपेकर हे पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षक असून, त्यांच्याकडे नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. कारागृह विभागात उपमहानिरीक्षक ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मानली जाते. या संवर्गात एकूण पाच पदे मंजूर असून, त्यापैकी दोन पदे भरलेली आणि तीन रिक्त आहेत. सुपेकर यांच्याकडे रिक्त असलेल्या तीन पदांचा अतिरिक्त कार्यभार होता, जो आता काढून घेण्यात आला आहे.
सुपेकर यांच्याकडून अतिरिक्त कार्यभार काढून घेतल्यानंतर, नागपूरची जबाबदारी उपमहानिरीक्षक स्वाती साठे, नाशिकची जबाबदारी अधीक्षक अरुणा मुगटराव आणि छत्रपती संभाजीनगरची जबाबदारी अधीक्षक वैभव आगे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपांमुळे सुपेकर यांच्यावर झालेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे, आणि याबाबत पोलिस विभागात चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
-वैष्णवी हगवणे प्रकरण: “हॅलो, निलेशला पकडलंय गाडीच्या डिक्कीत डांबलाय..” नेमकं प्रकरण काय?
-वैष्णवीचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलाचे जुने कांड उघड; “3 वर्षापूर्वीच एका वकिलाला…”
-आता भाजप आमदारही नाहीत सुरळीत? शिवीगाळ केली अन् घरात घुसण्याचा प्रयत्न, एकाला अटक