पुणे : पुणे महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्याला त्रास देणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना (ठाकरे) पक्षाने केली आहे. गुरुवारी पक्षाने याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहे. महिला अधिकाऱ्याने चार ते पाच महिन्यांपूर्वी अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे आणि आयुक्तांकडे तक्रार नोंदवली होती, परंतु प्रशासनाने याची दखल न घेतल्याने तिने थेट राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. गेल्या ४ महिन्यांपासून पदाधिकारी वेगवेगळ्या कारणाने त्रास द्यायचा अशी माहिती समोर आली आहे.
ओमकार कदम असं भाजप पदाधिकाऱ्याचं नाव आहे. तो थेट केबिनमध्ये घुसून जाब विचारायचा. घरासोबतच महिलांना कामाच्या ठिकाणीही छळाला सामोरं जावं असल्याचं आता दिसून येत आहे. ‘ओमकार कदम हा महिला अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये येऊन मानसिक त्रास देतो. याबाबत भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांसह पक्षाच्या अन्य नेत्यांकडेही तक्रार केली होती, परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही’, असा दावा संबंधित महिला अधिकाऱ्याने केला आहे. या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाच्या शिवसेनेने महापालिकेला कारवाईसाठी दबाव टाकला आहे. जर प्रशासनाने याबाबत टाळाटाळ केली, तर आंदोलन करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.
महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत तक्रार समितीने चौकशी करून अहवाल सादर केला होता. यात अधिकाऱ्याच्या कक्षाबाहेर सुरक्षारक्षक नेमण्याची, नागरिकांनी दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांशी वाद न घालता खातेप्रमुखांशी चर्चा करण्याची आणि अशा वर्तनाला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याची शिफारस करण्यात आली होती, अशी माहिती समितीच्या अध्यक्ष डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी असा कोणताही अहवाल आपल्याकडे आला नसल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी असला, तरी कोणालाही महापालिकेत असे वर्तन करता येणार नाही. याची संपूर्ण माहिती घेतली जाईल. अधिकाऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या व्यक्तींचा महापालिकेत प्रवेश बंद केला जाईल, असे पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
-पुणेकरांनो, बकरी ईद निमित्त शहरातील हे रस्ते असणार बंद; पहा कोणते पर्यायी मार्ग
-दादांच्या कार्यकर्त्यांना हवाय साहेबांचा आशिर्वाद; पुण्यात झळकले बॅनर्स
-शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्वाची बैठक; पदाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना