पुणे : पुणे शहरात गेल्या अनेक दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. एकीकडे आधुनिकीकरणामुळे शहर प्रगती पथावर आहे, तर दुसरीकडे याच शहरामध्ये भोंदूगिरीचे बळी पडत असल्याचे पहायला मिळत आहे. कोथरूड परिसरात राहणाऱ्या एका महिलेला सोन्याचा हंडा मिळवून देण्याच्या बहाण्याने 2 लाख 60 हजार रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरेगाव पार्क येथील भोंदूबाबा महंमद खानसाहेब जान मदारी याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोथरूडमधील तक्रारदार महिला विधवा असून तिला दोन मुले आहेत. घरच्या आर्थिक अडचणींमुळे ती गेल्या वर्षापासून आपल्या मैत्रिणीमार्फत महंमद खानसाहेब जान मदारी याच्याकडे जात होती. तिने आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याची इच्छा बाबासमोर बोलून दाखवली. त्यानंतर मदारीने तिला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी जादूटोणा करून सोन्याचा हंडा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी पूजा करावी लागेल, असे सांगून तिच्याकडून 2 लाख 60 हजार रुपये घेतले.
मदारीने पंधरा दिवसांपूर्वी महिलेच्या घरी पूजा मांडून तिला एक मातीचे मडके दिले, ज्यावर काळे कापड बांधलेले होते. हे कापड 17 दिवसांनंतर रात्री 11:21 वाजता उघडण्यास सांगितले. मात्र, 15 दिवसांनंतर मडके उघडले असता त्यात मातीच आढळली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सापळा रचून महंमद खानसाहेब जान मदारी (वय 65, रा. मदारी वस्ती, कोरेगाव पार्क) याला ताब्यात घेतले.
या प्रकरणाने कोरेगाव पार्क आणि कोथरूड परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, 2013 च्या कलम 3(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
-बुधवार पेठेत जाणाऱ्यांचा पाठलाग, घरापर्यंत जायचे अन् उकळायचे पैसे; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
-‘बावनकुळे काटेचे गॉडफादर’, प्रवीण गायकवाडांनी पत्रकार परिषदेत दाखवला ‘तो’ व्हिडीओ
-लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन
-हनी ट्रॅप जाळ्यात आजी माजी मंत्री; महिलेनं व्हिडिओसकट दाखल केली तक्रार
-तळजाई टेकडीवर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गावगुंडांकडून बेदम मारहाण