पुणे : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून, यावर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आता बांधकामाशी संबंधित जड वाहनांच्या वाहतुकीवरील निर्बंध सशर्त शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार, शनिवारी आणि रविवारी बांधकामाशी निगडित अवजड वाहनांना शहरात वाहतुकीस परवानगी देण्यात येणार आहे. हा बदल प्रायोगिक तत्त्वावर लागू केला जाणार असून, अंतिम निर्णय नंतर घेतला जाईल.
वाहतूक पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी शहरातील रस्त्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर हा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, बांधकामासाठी आवश्यक डंपर, रेडी मिक्स काँक्रीट मिक्सर यांसारख्या जड वाहनांना वाहतुकीची परवानगी असेल. मात्र, जेसीबी, रोड रोलर, ट्रॅक्टर यांसारखी ‘स्लो मुव्हिंग’ वाहने तसेच सामान्य मालवाहू वाहनांवरील निर्बंध पूर्वीप्रमाणेच कायम राहतील.
2 ते 23 ऑगस्ट या कालावधीत दर शनिवारी तसेच 15 ऑगस्ट या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बांधकामाशी संबंधित जड वाहनांना दुपारी 4 ते रात्री 10 या वेळेत वाहतुकीची परवानगी असेल. तसेच, 3 ते 24 ऑगस्ट या कालावधीत दर रविवारी रेड झोनसह शहरात सर्वत्र या वाहनांना वाहतुकीस परवानगी देण्यात येईल. सर्व बांधकाम व्यावसायिक आणि वाहनचालकांना या आदेशाचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायद्यांतर्गत थेट कारवाई करण्यात येईल, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
-ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
-पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?
-पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य