पुणे : सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या कै. विनायक निम्हण स्मृती करंडक ५९व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात प्रशांत मोरे याने तर, महिला गटात केशर निर्गुण यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले. गोविंदा गार्डन मंगल कार्यालय, सोमेश्वर कॉर्नर, बाणेर, पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात अंतिम फेरीत दोन वेळच्या जागतिक विजेत्या मुंबईच्या प्रशांत मोरेने मुंबईच्या विकास धारियाचा 24-10, 25-00 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 3ऱ्या व 4थ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ठाण्याच्या जाईद फारुकीने रत्नागिरीच्या रियाज अलीचा 24-11, 23-20 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.
महिला गटात अंतिम फेरीत सिंधुदुर्गच्या केशर निर्गुण हिने ठाण्याच्या समृद्धी घडीगावकरचा 22-17, 24-14 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. 3ऱ्या व 4थ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या सोनाली कुमारीने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरचा 00-25, 22-17, 20-15 असा पराभव करून तिसरे स्थान पटकावले.
यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव म्हणाले की, कॅरम खेळताना चौकस बुद्धी, एकाग्रता खूप महत्वाची असते. दिवसेंदिवस या खेळाचा प्रसार वाढत चालला असून या खेळाची लोकप्रियता देखील अशा स्पर्धांमुळे वाढत चालली आहे. सनी निम्हण म्हणाले की, भविष्यात देखील कॅरमच्या स्पर्धा आम्ही सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने सातत्याने आयोजित करण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहू.
मिलिंद दिक्षित म्हणाले की, कॅरम खेळाशी कोणत्या ना कोणत्या गोष्टीने मी नेहमीच जोडला गेलेलो आहे. कॅरमला आता स्पर्धात्मक स्वरूप तर प्राप्त झाले आहेच. पण व्यावसायिकता देखील यामध्ये आली आहे. सनी निम्हण यांच्या पुढाकाराने अशा स्पर्धेमुळे आणखी गुणवान खेळाडू घडतील आणि जागतिक स्तरावर आणखी आपले नाव उंचावतील याची मला नक्कीच खात्री आहे.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूना करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य व माजी नगरसेवक सनी निम्हण, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्याचे सहाय्यक आयुक्त मिलिंद दिक्षित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमसीएचे चेअरमन भरत देसलडा, उपाध्यक्ष धनंजय साठे, मानद सचिव अरुण केदार, केतन चिखले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया कुणाल यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
-धक्कादायक: पुणे पालिका आयुक्तांचं घर कोणी लुटलं, सीआयडी चौकशीची मागणी
-कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट
-सोमेश्वर फाउंडेशन आयोजित ‘विनायकी विनायक निम्हण गौरव’ शिष्यवृत्ती प्रदान