पुणे : भाजप आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्यासह 32 जणांविरुद्ध खेड न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. सुनावणीला हजर न राहिल्याने न्यायालयाने हा निर्णय घेतला. या सर्व नेत्यांनी अटक वॉरंटविरोधात उपजिल्हा न्यायालयात दाद मागितली आहे.
नेमकं काय प्रकरण?
2017 मध्ये चाकण येथे पुणे-नाशिक महामार्गावर बैलगाडा शर्यत बंदीविरोधात सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन झाले होते. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते आणि बैलगाडा मालकांनी सुमारे तीन तास वाहतूक अडवली होती. बैलगाडा मालकांनी रस्त्यावर बैल बांधल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे या नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
त्या वेळी राज्य सरकारने बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी अध्यादेश काढला होता आणि प्राण्यांना इजा न होता शर्यती घ्याव्यात, असेही सुचवले होते. मात्र, पेटा या सामाजिक संस्थेने याविरोधात न्यायालयात दावा दाखल केला, ज्यामुळे बैलगाडा शर्यतींना पुन्हा बंदी लागली. याविरोधात सर्वपक्षीय नेते आणि बैलगाडा मालकांनी पेटा संस्थेविरुद्ध घोषणाबाजी करत आंदोलन केले होते.
याबाबत माजी आमदार दिलीप मोहिते म्हणाले, “शासनाने राजकीय आंदोलनांशी संबंधित खटले मागे घेतले आहेत, त्यामुळे आम्ही सुनावणीला हजर राहिलो नाही. खटले मागे घेण्याची फक्त कायदेशीर प्रक्रिया बाकी आहे. ही आंदोलने आम्ही समाजहितासाठी केली होती. यात आमचा वैयक्तिक दोष नाही. त्यामुळे अशा घटना घडल्या तरी आम्ही जाणीवपूर्वक काही केले आहे, असा त्याचा अर्थ नाही.”
महत्वाच्या बातम्या
-पुनीत बालन ग्रुपने आयोजित केलेली संयुक्त दहिहंडी साजरी होणार ‘डिजे मुक्त’
-भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे
-स्वर्गीय विनायक निम्हण स्मृती करंडक ‘महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद’ स्पर्धा
-धक्कादायक: पुणे पालिका आयुक्तांचं घर कोणी लुटलं, सीआयडी चौकशीची मागणी