पुणे : कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने खोटी बलात्काराची तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणीने 2 जुलै 2025 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका कुरिअर बॉयने घरी येऊन तोंडावर केमिकल स्प्रे मारून बेशुद्ध केलं आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
पुणे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला अन् 500 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. अनेक कर्मचाऱ्यांना कामाला लावले. तपासादरम्यान, तरुणीच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅट आणि मेसेजेस तपासले असता धक्कादायक माहिती समोर आली. तरुणीने स्वतःच त्या तरुणाला 1 जुलै रोजी घरी बोलावले होते आणि त्याला “पूर्वीप्रमाणेच ये” आणि “जादा कपडे घेऊन ये” असा मेसेज पाठवला होता. यावरून हे स्पष्ट होत आहे की, हा तरुण कुरिअर बॉय नसून तिचा मित्र होता आणि त्यांच्यात परस्पर सहमतीने भेट झाली होती.
पोलिस तपासात हेही उघड झाले की, तरुणीने स्वतः आणि त्या तरुणाने एकत्र फोटो काढले होते, जे त्यांच्या मैत्रीचे पुरावे होते. या सर्व तथ्यांमुळे तरुणीने खोटी तक्रार केल्याचे स्पष्ट झाले. परिणामी, पोलिसांनी तिच्यावर बनावट पुरावे तयार करणे आणि खोटी माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
तरुणीने ही खोटी तक्रार का केली आणि तिचा हेतू काय होता, याचा तपास आता न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढे सुरू होईल. पोलिसांनी असेही स्पष्ट केले की, खोट्या तक्रारींमुळे पोलिसांचा आणि प्रशासनाचा वेळ वाया जातो, त्यामुळे अशा प्रकरणांवर कठोर कारवाई केली जाईल. या तरूणीने अत्याचाराचा हा बनाव का केला? याबाबतचा न्यायालयाच्या परवानगीने शोध घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांना खोटी माहिती देणे, खोटे पुरावे तयार करून पोलिसांना अधिकाराचा गैरवापर करण्यास प्रवृत्त करणे अशा विविध कलमांन्वये कोंढवा पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. यावरून तरुणीची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या
-पालिकेच्या तृतीयपंथी सुरक्षारक्षकांना कित्येक महिने वेतनच नाही, थकलेला पगार मिळेल की नाही?
-वैष्णवी हगवणेच्या मृत्यूचं धक्कादायक कारण आलं समोर; चौकशी समतीच्या अहवालाने खळबळ
-‘ही बॅटरी लवकरच संपणार’, शिंदेसेनेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं
-शरद पवारांना मोठा धक्का; जुना सहकरी अजितदादांच्या संपर्कात?
-बुधवार पेठेत आणखी एक धक्कादायक घटना; इंजिनिअर टॉपरला अटक, नेमकं काय प्रकरण?