पुणे : पिंपरी चिंचवडच्या कासारसाई भागात जमिनीच्या वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी आलेल्या टोळक्याने शेतकरी कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवल्याच्या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाअसून परिसरात मुळशी पॅटर्नची पुनरावृत्ती होत असल्याचं पहलायला मिळालं. यामुळे शेतकरी दहशतीखाली आहेत. आता हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुळशी पॅटर्न हा चित्रपट देखील पुणे जिल्ह्यातील वाढते औद्योगिकरण आणि जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारातून वाढलेल्या गुंडगिरीवरच आधारित आहे. अशातच पुन्हा एकदा जमिनीच्या वादातून एका वकिलाने बंदूक दाखवून शेतकऱ्यांना धाक दाखवल्याचं व्हिडिओमध्ये कैद झालं. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं?
वादातील जमिन पाहण्यासाठी आलेल्या वकिलाची जमिन मालकाने अडवणूक केल्यानंतर संबंधित वकिलाने चक्क बंदुकीचा धाक दाखवल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणात ऍड. संदीप भोईर हे आपल्या साथीदारांसह कासारसाईतील वादग्रस्त जमिनीवर गेले होते. स्थानिक शेतकरी शब्बीर मुलानी यांनी त्यांना विरोध केला असता, वाद तीव्र झाला. संतापलेल्या भोईर यांनी आपल्या कंबरेला असलेली बंदूक बाहेर काढून मुलानी कुटुंबाला धमकावले. यामुळे शेतकरी कुटुंब भयभीत झाले, तर भोईर आणि त्यांचे साथीदार तिथून पळून गेले. हा सर्व प्रकार व्हिडीओत कैद झाला आहे.
हा वाद शब्बीर मुलानी आणि धनंजय वाडकर यांच्यातील जमिनीच्या मालकीवरून गेल्या १० ते १२ वर्षांपासून सुरू आहे. वाडकर यांनी मुलानी यांची काही जमीन खरेदी केली होती, परंतु ती कूळ कायद्यांतर्गत येत असल्याने न्यायालयीन लढाई सुरू आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास भोईर, जे वाडकर यांचे वकील आहेत, ते जमीन पाहण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला. मुलानी कुटुंबाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भोईर यांनी बंदूक बाहेर काढली, ज्यामुळे वाद आणखी चिघळला. हिंजवडी पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या व्यक्तींना चौकशीसाठी बोलावून घेतले असून आता पुढील कारवाई केली जाणार आहे. ही घटना पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाढत्या गुन्हेगारी आणि जमिनीच्या वादातून निर्माण होणाऱ्या समस्यांचे गंभीर असल्याचे दिसून येते.
महत्वाच्या बातम्या
-राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू
-PMC: महिला अधिकाऱ्याला त्रास देणारा भाजप पदाधिकारी कोण? बड्या नेत्यासोबत उठबस, कारवाई होणार का?
-पुणेकरांनो, बकरी ईद निमित्त शहरातील हे रस्ते असणार बंद; पहा कोणते पर्यायी मार्ग