पुणे : पुण्यातील खराडीतील उच्चभ्रू परिसरात असलेल्या ‘स्टेबर्ड अझुर सूट’ या हॉटेलमध्ये शनिवारी रात्री पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (SP)चे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांना या पार्टीत कोकेन आणि गांजासदृश पदार्थ आढळल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे आणि एथिकल हॅकर मनीष भंगाळे यांनी या प्रकरणी गंभीर दावे केले आहेत.
वकील विजयसिंह ठोंबरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “रेव्ह पार्टी हा शब्द वापरणे बालिशपणाचे आहे. केवळ एका फ्लॅटमध्ये लोक जमले म्हणून त्याला रेव्ह पार्टी म्हणता येणार नाही. प्रांजल खेवलकर यांनी कोणताही अमली पदार्थ सेवन केलेला नाही, आणि याची पुष्टी रक्त तपासणी अहवालातून होईल. खेवलकर यांना जाणीवपूर्वक दोनदा जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला असून, हे संपूर्ण प्रकरण बनावट आहे.”
एथिकल हॅकर मनीष भंगाळे यांनीही या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, प्रांजल खेवलकर यांचा या रेव्ह पार्टीशी कोणताही संबंध नाही. “खेवलकर यांना फोनद्वारे त्या ठिकाणी बोलावण्यात आले आणि नंतर छापेमारी करून त्यांना अडकवण्यात आले,” असा दावा भंगाळे यांनी केला. त्यांनी गोळा केलेल्या तांत्रिक माहितीनुसार, खेवलकर यांना या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवण्यात आले आहे.
“खेवलकर यांना त्या ठिकाणी बोलावण्यात आले होते. त्यांचा त्या पार्टीतील लोकांशी काहीही संबंध नव्हता, आणि ते त्यांना ओळखतही नव्हते. यापूर्वी त्यांचा त्या लोकांशी संपर्कही नव्हता. मी येत्या एक-दोन दिवसांत पुणे पोलिसांना याबाबत सर्व माहिती देईल. पुणे पोलिसांनी खेवलकर यांचे कॉल रेकॉर्ड आणि इतर तपशील तपासले, तर त्यांच्याविरुद्ध रचण्यात आलेला कट स्पष्ट होईल,” असेही भंगाळे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-अमली पदार्थ अन् विदेशी मद्य, पोलिसांच्या छाप्यात खडसेंच्या जावई जाळ्यात, नेमकं काय घडलं?
-अध्यक्षांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत महिलाराज; मोहोळांच्या गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य निर्णय
-राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित
-पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; १० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त
-पुण्यातील भाजप मंत्र्याची ‘ताईगिरी’, शिंदेंच्या मंत्र्यावर सर्जिकल स्ट्राईक