पुणे : कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी काँग्रेसला रामराम करुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावरुन काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. तर धंगेकरांच्या शिवसेनेत येण्याने महायुतीमध्ये देखील वादाचा भडका उडाल्याचे पहायला मिळत आहे. मंत्री चंद्रकांत पाटलांनी धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर आधी उघड नाराजी व्यक्त केली होती. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी देखील टीका करताना धंगेकरांची कुंडलीच काढली आहे.
‘आपल्याला वाटत होतं का? अजित पवार आणि भाजप एकत्रित येतील. मात्र, राजकारणात काहीही होऊ शकतं. अजितदादांना तर त्यांनी जेलच्या दारात नेऊन बसवलं होतं. अजित पवारांविरोधात ट्रकभर कागदपत्रं असल्याचं सांगितलं जात होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर अजित पवारांना सोबत घेऊन अर्थ खातंही देण्यात आलं, त्यामुळे राजकारणात असं काही नसतं’, अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी पक्षप्रवेशानंतर अजित पवारांवर केली होती. यावरुन आता अजित पवार गटाने धंगेकरांच्या टिकेला उत्तर देताना त्यांना चांगलंच सुनावलं आहे.
काय म्हणाले दीपक मानकर?
‘धंगेकर स्वतः ४ दरवाजे फिरून शिंदे गटात प्रवेश केला. अजितदादांबद्दल बोलण्याची त्यांची लायकी आहे का? आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले, त्यावेळी अजितदादांच्या पाया पडून विनंती करून राष्ट्रवादीची मदत घेऊन गद्दार निवडून आले, नंतर सरड्यासारखे रंग बदलायला लागले. अजित पवार ज्या दिवशी डोक्यावर पाय देतील त्यावेळी कळेल. दादांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सहन करणार नाही. नाही तर एक दिवस तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही’, असा इशारा दिपक मानकरांनी रवींद्र धंगेकरांना दिला आहे.
‘पुण्यातील पब संदर्भात आंदोलन करायची, हप्ते वसूल करून नंतर आंदोलन स्थगित करायची. कॉर्पोरेशनच्या कामांमध्ये बिल्डर लोकांची कामं अडवून खंडणी वसूल करायची. लक्ष्मीरोडच्या सराफांकडून घर दुरुस्तीच्या नावाने कॉर्पोरेशनकडून बांधकामाला परवानगी घेवून सगळी सोन्या मारुती चौकातील बांधकामे बेकायदेशीर करून पैसे वसूल करायचे, वक्फ बोर्डाची मुसलमान समाजाची गणेश पेठेतील जमीन गिळंकृत केली’, असे अनेक आरोप करत मानकरांनी धंगेकरांची कुंडली माध्यमांसमोर मांडली आहे.
“केलेली पापे इथेच फेडायची आहेत”
‘लाचलुचपत खात्यात त्यांच्या विरोधात १५० कोटी रुपयांची प्रॉपर्टी कुठून आली याची चौकशी सुरु आहे. क्राईम ब्रांच युनिट १ ला खंडणीचा गुन्हा प्रलंबित आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचा या पडीक आमदारास दादांनी केलेल्या उपकाराची जाणीव नाही. वाटेल ते स्टेटमेंट करतात. दादांनी त्यांना दाखवले आहे. ज्या दिवशी बडगा दाखवतील त्यावेळी या बांडगुळाला त्याची लायकी समजेल. शिंदे गटात जाऊन स्वतःला भविष्यात पोलिसांकडून होणारा त्रास कमी होणार नाही. गृह खाते देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. याची जाणीव ठेवा. केलेली पापे इथेच फेडायची आहेत’, अशा तिखट शब्दात मानकरांनी धंगेकरांना सुनावलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-स्वारगेट प्रकरणात धक्कादायक अपडेट; पीडितेला 7500 रुपये दिलेच नाहीत, नेमकं काय प्रकरण?
-कुख्यात गुंड गजा मारणेची सांगलीच्या कारागृहात रवानगी; नेमकं कारण काय?
-शिंदेंना पुण्यात दुसरी लॉटरी; धंगेकरांनंतर आता ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या गळाला
-स्वारगेट डेपो प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर; महिला प्रवासी स्टँडमध्ये असताना मध्यरात्री अचानक…
-हलाल, झटका मटणावरुन राजकारणात मोठा वाद; ‘मल्हार’ सर्टिफिकेशनवरून जेजुरी संस्थान विश्वस्तांचा विरोध