पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं असून यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात आले. या संभाव्य एकत्रिकरणाला काही नेते आणि कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध आहे, तर काही नेते याबाबत उत्साहात असून तातडीने निर्णय घेण्याचा आग्रह धरत आहेत. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये हे सर्व सुरु असतानाच पुण्यातील डेक्कन चौकात लावण्यात आलेले एक पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
या पोस्टरमध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचा एकत्रित फोटो आहे, तसेच शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र असल्याचा फोटोही वापरण्यात आला आहे. हे पोस्टर युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष विनायक गायकवाड यांनी लावले आहे.
पोस्टरवर काय मजकूर?
“सुप्रिया ताई साहेबांची इच्छा पूर्ण करा. साहेबांनी संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार तुमच्यावर सोपवले आहेत. लवकरात लवकर निर्णय घेऊन अजितदादा आणि आपण पुन्हा एक कुटुंब होऊया. संपूर्ण महाराष्ट्र आपण एकत्र येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे,” असा मजकूर लिहिण्यात आला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची कार्यकारिणी बैठक बुधवारी होणार असून, या बैठकीत विलीनीकरणाच्या मुद्द्यावर मुंबईत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत अनेक कार्यकर्ते आपली नाराजी आणि भावना थेट वरिष्ठ नेत्यांसमोर मांडण्याच्या तयारीत आहेत. विलीनीकरणामुळे दोन्ही गटांतील काही नेते आपल्या हितसंबंधांना धोका आणि पक्षातील आपले महत्त्व कमी होण्याच्या भीतीने अस्वस्थ आहेत.
विलीनीकरणाला विरोध करणारे नेते आपले मत वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच डेक्कन चौकातील पोस्टरने या चर्चेला आणखी तीव्रता आली आहे. दोन्ही गट एकत्र येण्याच्या शक्यतेवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काहींना एकत्र येणे पक्षाच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल असे वाटते, तर काहींना आपली राजकीय ओळख आणि प्रभाव कमी होण्याची चिंता आहे. त्यामुळे आता होणाऱ्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
-पुणेकरांनो घरातून बाहेर पडताना छत्री, रेनकोट विसरू नका, शहराला यलो अलर्ट जारी
-लाडक्या लेकीच हुशार! दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी
-पुण्यात आरटीओची मोठी कारवाई; ३४ हजार बेशिस्त वाहनचालकांना दणका, लाखो रूपयांचा दंड वसूल
-मान्सून निकोबार बेटावर दाखल झालाय; आपल्याकडे कधी पोहचणार?
-#ऑपरेशन_सिंदूर सुरुच! इट का जवाब पत्थर से, भारताचा पाकला कडक इशारा