पुणे : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. येत्या ६ मे २०२५ रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. राज्यातील अनेक महापालिका गेल्या पाच वर्षांपासून निवडणुकांशिवाय प्रशासकांद्वारे चालवल्या जात आहेत. ही बाब लोकशाहीला धक्का देणारी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले असल्यामुळे ४ आठवड्यांत निवडणूक अधिसूचना जारी करून सप्टेंबर २०२५ पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी आयोगाने सरकारला फेर प्रभाग रचनेचे निर्देश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर व्हाव्यात आणि कोणत्याही वादाला जागा राहू नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याबाबतचे ‘टीव्ही९ मराठी’ने वृत्त दिले आहे.
या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, सप्टेंबर २०२५ मध्ये या निवडणुका होणार असून, त्यासाठी आता राज्य सरकार आणि निवडणूक आयोग सक्रिय झाले आहे. या निवडणुकांमुळे स्थानिक पातळीवर लोकशाही प्रक्रिया पुन्हा रुळावर येण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या प्रभाग रचनेची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी गट आणि गणांची फेररचना करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारला आता प्रभाग, गट आणि गणांची रचना करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
-आधी सफरचंद आता ड्राय फ्रुट्स: तुर्कीच्या जर्दाळू आणि हेजलनट आयातीवर बहिष्कार
-SSC: शिक्षणाला कशाचंच बंधन नसतं; कचरा वेचणाऱ्या प्रियंका कांबळे दहावीत उत्तीर्ण
-फक्त नावालाच स्पा, बाप-लेकाचा बाणेरमध्ये वेश्या धंदा, पोलिसांनी टाकले दंडुके
-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपक मानकरांनी दिला शहराध्यक्षपदाचा राजीनामा; पत्रात नेमकं काय म्हणाले?