पुणे : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून, प्रशासकीय स्तरावर देखील हालचाली सुरू झाल्या आहेत. इच्छुक उमेदवारांकडूनही मोर्चेबांधणीला वेग आला आहे. या निवडणुका ‘महायुती विरुद्ध महाविकास आघाडी’ असा होणार की युतीतून काही पक्ष स्वबळावरही उतरणार? हा प्रश्न मात्र कायम आहे. यामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचक विधानामुळे भाजप जिथे आपली ताकद आहे अशा ठिकाणी वेगळे लढण्याच्या भूमिकेत असल्याचं दिसत आहे.
पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “आम्हाला या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. मात्र, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. काही ठिकाणी तुल्यबळ लढत असल्याने इतरांना जागा सोडणे शक्य होत नाही. अशा ठिकाणी आम्ही स्वबळावर लढू. पण वेगळे लढलो तरी एकमेकांवर टीका नाही, तर सकारात्मक प्रचारच केला जाईल. तरीसुद्धा जास्तीत जास्त ठिकाणी युती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”
दरम्यान, “कार्यकर्ते अनेक वर्षांपासून मेहनत करत आहेत. त्यांना संधी मिळाली पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असते. महायुतीत समन्वय आहे, जिथे शक्य आहे तिथे युती होईलच, पण जिथे वेगळे लढलो तिथे निवडणुकीनंतर एकत्र येऊ.”
यावेळी बोलताना निवडणुकांच्या वेळापत्रकावरही त्यांनी भाष्य केलं. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांची मुदत दिली असली, तरी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निवडणुका दोन महिने पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर फडणवीस म्हणाले, “निवडणुका घेण्यात फार अडथळे नाहीत. वेळेत निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू. काही भागांत पावसामुळे अडचण असेल, तर आयोगाकडे कालावधी वाढवण्याची विनंती करू.”
हत्वाच्या बातम्या
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पुण्यात कोण करणार नेतृत्व? ‘या‘ नावाची चर्चा, पण दादांची पसंती कोणाला?
-Local body Election: इच्छुकांची धाकधूक वाढवणारी बातमी, निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला महत्वाचे आदेश
-आधी सफरचंद आता ड्राय फ्रुट्स: तुर्कीच्या जर्दाळू आणि हेजलनट आयातीवर बहिष्कार
-SSC: शिक्षणाला कशाचंच बंधन नसतं; कचरा वेचणाऱ्या प्रियंका कांबळे दहावीत उत्तीर्ण