पुणे : वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर तिचे नऊ महिन्यांचं बाळ आईपासून पोरकं झालं आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे बाळ गायब झाल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला होता. वैष्णवीच्या मामांनी धक्कादायक खुलासा करत बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाने तीव्र पडसाद उमटल्यानंतर अखेर पोलिसांनी बाळाला ताब्यात घेतले आणि वैष्णवीच्या माहेरच्या कस्पटे कुटुंबाकडे सुपूर्द केले. या घटनेमुळे कस्पटे कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला असून, बाळाला पाहताच आजी-आजोबांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याचे पहायला मिळाले आहेत.
या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या दोन महिला नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अजित पवार यांनी वैशाली नागवडे आणि रुपाली पाटील या महिला नेत्यांना वैष्णवीचं बाळ कस्पटे कुटुंबाकडे सुपूर्द करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, या रुपाली पाटील आणि वैशाली नागवडे यांनी तातडीने पावले उचलत बाळाला हगवणे कुटुंबाच्या नातेवाइकांकडून ताब्यात घेतले. बाळाला कस्पटे कुटुंबाच्या घरी सुखरूप पोहोचवण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पोलिसांचाही सहभाग होता, ज्यांनी बाळाची सुरक्षा आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात मदत केली आहे.
‘बाळाला एकतर बावधन पोलीस ठाण्यात आणून द्यावे, नाहीतर थेट कस्पटे कुटुंबाच्या हवाली करावे. अन्यथा, बाळ पळवल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा रुपाली पाटील यांनी हगवणे कुटुंबाच्या नातेवाइकांना दिला होता. हगवणे कुटुंबाच्या नातेवाइकांनी सुरुवातीला बाळ देण्यास टाळाटाळ केली, मात्र, अजित पवार यांच्या हस्तक्षेपानंतर आणि पोलिसांच्या दबावामुळे अखेर त्यांनी बाळ कस्पटे कुटुंबाच्या स्वाधीन केले.
वैष्णवीच्या वडिलांनी या प्रसंगी भावना व्यक्त करताना सांगितले की, “बाळाच्या रूपाने आम्हाला वैष्णवी परत मिळाली आहे. आम्ही त्या बाळाला वैष्णवीच मानून या बाळाचा सांभाळ करणार आहोत.” त्यांनी बाळाला परत मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला, परंतु बाळ कुठे होते, याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या बाळाचा ताबा मिळवण्यासाठी कस्पटे कुटुंबाने बराच संघर्ष केला होता. या प्रकरणात अजित पवार यांच्या हस्तक्षेपामुळे कस्पटे कुटुंबाला न्याय मिळाला, असे वैष्णवीच्या वडिलांचे म्हणणे आहे.
या प्रकरणाने पुणे आणि परिसरात तीव्र पडसाद उमटवले असून, वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी हगवणे कुटुंबावर सुरू असलेल्या तपासाला वेग आला आहे. वैष्णवीच्या आत्महत्येमागे सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी झालेला छळ कारणीभूत असल्याचा आरोप आहे. सध्या राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबाकडे आल्यानंतर आता या प्रकरणात पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
-वैष्णवी हगवणे प्रकरणी अजितदादांनी अखेर उचललं पाऊल; राजेंद्र हगवणेंवर केली ‘ही’ मोठी कारवाई
-चिमुकली टीव्ही बघायला गेली अन् नराधम शेजाऱ्याने संधी साधली, शेजारधर्माला काळिमा फासणारी घटना
-राज्याला अवकाळी पावसाचा फटका; मुख्यमंत्र्यांनी शेकऱ्यांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय