पुणे : काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागल्यानंतर पक्षात मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बदल होण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मात्र, प्रत्यक्षात तशा हालचाली दिसल्या नाहीत त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रतिक्षेत असलेल्या काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी स्थानिक निवडणुकीत कायम राहील की नाही, याबाबतही संभ्रम आहे. यामुळे नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये चिंता आणि गोंधळाचे वातावरण आहे.
महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत अनिश्चितता असल्याने काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांमध्ये चलबिचल सुरू आहे. जर आघाडी तुटली, तर काँग्रेस स्वबळावर कितपत यश मिळवू शकेल, याबाबत शंका निर्माण झाली आहे. यामुळे काही काँग्रेस नेते आता महायुतीतील इतर पक्षांचा पर्याय शोधताना दिसत आहेत. पुण्यातील सहा माजी नगरसेवक, एक माजी आमदार आणि अनेक पदाधिकारी महायुतीतील पक्षांमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. हे नेते आपल्या राजकीय भवितव्यासाठी नव्या पर्यायांचा विचार करत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील काही नेते तिकिटाची हमी, पक्षातील महत्त्वाची पदे आणि महामंडळांवरील नियुक्त्या यासारख्या गोष्टींसाठी वाटाघाटी करताना दिसत आहेत. काहींच्या पक्षांतराच्या चर्चा अंतिम टप्प्यात असून, लवकरच काँग्रेसमधून मोठा गट बाहेर पडून इतर पक्षात प्रवेश करू शकतो, अशी शक्यता आहे. यापैकी काही नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत, तर काहींना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणे सोपे वाटत आहे. भाजपमध्येही इच्छुकांची संख्या जास्त असल्याने तिथे स्पर्धा तीव्र आहे, आणि ठोस आश्वासनांच्या प्रतीक्षा काही नेते करत आहेत.
सर्वच पक्षांमध्ये निवडणुकीच्या तयारीसाठी जोरदार हालचाली सुरू असताना काँग्रेसमध्ये मात्र शांतता आहे. भाजपकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. तसेच, ठाकरे बंधू एकमेकांना पाठिंबा देणार का, याबाबतही राजकीय वर्तुळात खलबतं होत आहेत. मात्र, काँग्रेसमध्ये निवडणुकीच्या तयारीचा अभाव दिसून येत आहे. यामुळे पक्षातील इच्छुक उमेदवार संभ्रमात असून, अनेक जण पक्षात अस्वस्थ आहेत. काहींनी पक्षांतराचा विचार सुरू केला आहे, तर काहीजण अद्याप परिस्थितीचा अंदाज घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या
-मुख्यमंत्री फडणवीस पुणे दौऱ्यावर; प्लास्टिक संकटाबाबत केली चिंता व्यक्त
-८ वर्षे महिन्याला ५० हजारांची खंडणी, तरीही व्यापाऱ्याला दमदाटी; शिवम आंदेकरच्या मुसक्या आवळल्या
-पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा ‘मास्टर प्लॅन’ रेडी; शनिवारी बोलवली महत्वाची बैठक
-चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप
-पुणे पोलीस दलात खळबळ; पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं कारण काय?