पुणे : पुण्यातील बावधन परिसरात अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत भक्तांची फसवणूक करणाऱ्या प्रसाद तामदार ऊर्फ प्रसाद दादा (वय २९, रा. सूस गाव) या भोंदूबाबाविरोधात बावधन पोलिस ठाण्यात गंभीर तक्रारी दाखल झाल्या आहेत. या बाबाने भक्तांच्या मोबाइलमध्ये ‘हिडन ॲप’ डाऊनलोड करून त्यांच्या खासगी क्षणांवर पाळत ठेवत अश्लील कृत्ये केल्याचा धक्कादायक प्रकार तपासात उघड झाला आहे. भक्तांना गुंगीचे औषध देऊन अत्याचार करताना तो स्वतःला त्यांचे दोष स्वतःवर घेणारा संत समजवत असे. विरोध करणाऱ्या भक्तांना मृत्यूच्या तारखेची भीती दाखवून मानसिक दबावाखाली ठेवल्याचेही समोर आले आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून तीन मोबाइल, एक डिजिटल पॅड, सहा पेनड्राइव्ह, चार मेमरी कार्ड आणि निद्रानाशावरील गोळ्यांचे पाकीट जप्त केले आहे. आरोपीने भक्तांचे खासगी क्षण ‘हिडन ॲप’द्वारे रेकॉर्ड करून लॅपटॉपवर साठवल्याचे उघड झाले आहे. पुरुष, महिला आणि लहान मुलांनाही त्याने फसवल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात आरोपीच्या कथित संस्थेच्या कायदेशीरतेचा तपास करण्यासाठी आणि इतर बाबींची चौकशी करण्यासाठी उपनिरीक्षक सारंग ठाकरे आणि सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी पोलिस कोठडीत वाढ मागितली, जी न्यायालयाने मान्य करून चार दिवसांची वाढ दिली.
आरोपी बाबाने एका भक्ताला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मोठे संकट येईल, अशी भीती दाखवून त्याच्या मोबाइलमध्ये ‘हिडन ॲप’ डाऊनलोड करण्यास सांगितले आणि पाण्यात गुंगीचे औषध देऊन अनैसर्गिक अत्याचार केले. दुसऱ्या भक्ताला गुंगीचे औषध देऊन अश्लील चाळे करताना दोष स्वतःवर घेत असल्याचे सांगितले. आणखी एकाला दोष दूर करण्यासाठी ‘हिडन ॲप’ सुरू ठेवून मैत्रिणीशी संबंध ठेवण्यास सांगितले. या कृत्यांना विरोध करणाऱ्या भक्ताला ‘उपाय अर्धवट सोडल्यास त्या तारखेला मृत्यू होईल,’ अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली.
या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून, अंधश्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या अशा भोंदूबाबांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलिस आता आरोपीच्या इतर संभाव्य बळींचा शोध घेत असून, त्याच्या संस्थेच्या कारवायांचा सखोल तपास करत आहेत. या प्रकाराने भक्तांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा फसव्या व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
-ठाकरे सेनेत गेल्यास मनसेचा काय फायदा? सर्वेक्षणानंतर मनसे घेणार निर्णय
-भोंदू बाबाचं आणखी एक सत्य समोर; भक्तांना निर्वस्त्र झोपायला लावायचा अन्….
-महाराष्ट्र हादरला: पंढरीला चाललेल्या वारकऱ्यांची लूट, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना
-स्वारगेट प्रकरणी मोठी अपडेट, दत्ता गाडेला जामीन मिळाला?
-पुण्यात इराणी देशाचे झेंडे अन् अली खामेनींचे फ्लेक्स, नेमका काय प्रकार?