पुणे : पुण्यातील येरवडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, एका 40 दिवसांच्या नवजात मुलीला साडेतीन लाख रुपयांत विकण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता कलम 143(2), 143(3), 143(4), 3(4) आणि बाल न्याय (मुलाची काळजी व संरक्षण) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ही घटना 2 जुलै 2025 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत घडली, तर गुन्हा 4 जुलै 2025 रोजी येरवडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला.
या प्रकरणातील आरोपींमध्ये बाळाची आई मिनल ओंकार सपकाळ (वय 30), वडील ओंकार औदुंबर सपकाळ (वय 29), एजंट साहिल अफजल बागवान (वय 27), रेश्मा शंकर पानसरे (वय 34), सचिन रामा अवताडे (वय 44) आणि बाळ खरेदी करणारी महिला दीपाली विकास फटांगरे (वय 32) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपकाळ दांपत्याला दीड महिन्यापूर्वी मुलगी झाली होती. घरात आर्थिक अडचणी असल्याने त्यांनी आपल्या मुलीला विकण्याचा निर्णय घेतला. एजंट साहिल बागवान याच्या माध्यमातून त्यांनी दीपाली फटांगरे यांच्याशी साडेतीन लाख रुपयांचा सौदा केला. कोणतीही कायदेशीर दत्तक प्रक्रिया न पाळता हा व्यवहार पार पडला. यात एजंटने दीड लाख रुपये कमिशन स्वतःकडे ठेवले आणि बाळाच्या आई-वडिलांना फक्त दोन लाख रुपये दिले. काही दिवसांनी सपकाळ दांपत्याला खरी रक्कम कळली आणि आपली फसवणूक झाल्याची जाणीव होताच त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला आणि या बाळ विक्री प्रकरणातील सर्व सहभागींना अटक केली.
या घटनेमुळे येरवडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचनेतून बाळाची विक्री करण्याचा प्रकार समोर आल्याने स्थानिकांमध्ये संताप आणि आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून, बाळाच्या सुरक्षिततेची खात्री केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
-एकनाथ शिंदेंच्या ‘जय गुजरात’च्या घोषणेवर फडणवीसांनी केली पाठराखण तर अजित पवार म्हणाले, ‘मला…’
-पुण्यातील डिलिव्हरी बॉय अत्याचार प्रकरणी मोठी ट्वीस्ट; आरोपी निघाला पडितीचा मित्र
-विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची २४ तास आरोग्यसेवा
-पुणे स्टेशनचं ब्राह्मण महासंघाकडून नामांतर; परिसरात लागले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानकचे बॅनर
-अमित शहांच्या पुणे दौऱ्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी, पुणेकरांना फटका