पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेली प्रारूप प्रभागरचना वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या रचनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी भाजपवर टीका करत म्हटले की, “महायुतीच्या सहकारी पक्षांशी समन्वय ठेवून प्रभागरचना करायला हवी होती.”
“या प्रभागरचनेमुळे शिवसेनेला काही प्रमाणात फायदा होईल की नाही हे स्पष्ट नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे प्रभाग अनियमित पद्धतीने विभागले गेले आहेत, ज्यामुळे पक्षाला नुकसान सहन करावे लागणार आहे. आम्ही याबाबत लवकरच आक्षेप नोंदवणार असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करू”, असं सुभाष जगताप म्हणाले आहेत.
प्रभागरचनेतील बदल आणि त्याचे परिणाम
प्रारूप प्रभागरचनेनुसार, शहराच्या मध्यवर्ती भागातील पर्वती, कसबा, कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघांतील प्रभागांची संख्या जैसे थे ठेवण्यात आली आहे. परंतु, उपनगरांतील प्रभागांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे नगरसेवकांची संख्या मर्यादित राहणार आहे. याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसेल, अशी भीती जगताप यांनी व्यक्त केली.
“विकासासाठी प्रभागरचना, सत्तेसाठी नव्हे”
राज्य सरकारने एका प्रभागात चार सदस्य असावेत, असा निर्णय घेतला होता. यामुळे महायुतीतील सर्व पक्षांचा समतोल राखला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, जाहीर झालेली प्रारूप रचना केवळ भाजपला लाभदायक ठरेल, अशीच तयार करण्यात आल्याचा आरोप जगताप यांनी केला. ते म्हणाले, “पुणे शहरात अनेक समस्या कायम आहेत. प्रभागरचना ही शहराच्या विकासासाठी असावी, राजकीय सत्तेसाठी नव्हे.” राष्ट्रवादी काँग्रेसने या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेण्याचे संकेत दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-PMC : प्रभाग रचनेवरुन शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये रंगणार शीतयुद्ध; नेमकं काय प्रकरण?
-‘दामिनी मार्शल’ला कॉल आला अन् ती म्हणाली, ‘मला खूप टेन्शन आहे, जगायचंच नाही’, पुढे काय घडलं?
-कोथरुड पोलिसांवर गंभीर आरोप करणाऱ्या मुलींवर गुन्हा दाखल; प्रकरणाला वेगळं वळण
-भाजप आमदारासह राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला अटक करण्याचे आदेश, ३२ जणांविरोधात वॉरंट