पुणे : पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करत आहेत. या वारकऱ्यांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या १२० रुग्णवाहिका २४ तास कार्यरत आहेत. भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) द्वारे राज्यात १०८ रुग्णवाहिका सेवेची अंमलबजावणी केली जाते. आतापर्यंत ८,६४३ वारकऱ्यांनी या आरोग्यसेवेचा लाभ घेतला आहे.
वारकरी बांधवांना तत्काळ आणि प्रभावी आरोग्यसेवा मिळावी, यासाठी पंढरपूर येथे आपत्कालीन वैद्यकीय सेवेने विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाद्वारे पालखी सोहळ्याचे बारकाईने निरीक्षण करून गरजेनुसार त्वरित वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल.
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश अबिटकर यांनी पायी वारी करणाऱ्या भाविकांना तत्काळ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आपत्कालीन वैद्यकीय सेवेला दिल्या होत्या. या सूचनांचे पालन करत बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांनी अवघ्या काही तासांत १२० रुग्णवाहिका पालखी सोहळ्यासाठी तैनात केल्या. या रुग्णवाहिकांद्वारे १२० डॉक्टर आणि १२८ ड्रायव्हर वारकऱ्यांना २४ तास वैद्यकीय सेवा पुरवत आहेत.
“पंढरीच्या वारीसारख्या पवित्र आणि श्रद्धेच्या केंद्रस्थानी असलेल्या सोहळ्यात वारकऱ्यांना आरोग्यसेवा देण्याची संधी मिळणे, हे आमचे भाग्य आहे,” अशी भावना हणमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार तातडीने १२० रुग्णवाहिकांचे नियोजन करण्यात आले. यामध्ये ९० बेसिक लाईफ सपोर्ट आणि ३० ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका आहेत. मानाच्या १० पालख्यांसाठी २४८ आरोग्यदूत अहोरात्र कार्यरत असून, वारकऱ्यांना आरोग्यमय वारीचा अनुभव मिळावा, यासाठी त्यांचा समर्पित प्रयत्न सुरू आहे.
पालखींची नावे खालिल प्रमाणे,
1) संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर )
2) संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )
3) संत सोपान काका महाराज ( सासवड )
4) संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )
5) संत तुकाराम महाराज ( देहू )
6) संत नामदेव महाराज ( पंढरपूर )
7) संत एकनाथ महाराज ( पैठण )
8) रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )
9) संत निळोबाराय ( पिंपळनेर – पारनेर अहमदनगर )
10) संत चांगाटेश्वर महाराज ( सासवड )
महत्वाच्या बातम्या
-पुणे स्टेशनचं ब्राह्मण महासंघाकडून नामांतर; परिसरात लागले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानकचे बॅनर
-अमित शहांच्या पुणे दौऱ्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी, पुणेकरांना फटका
-अमित शहा पुणे दौऱ्यावर अन् झाडाझडतीत तरुणाकडे सापडली पिस्तुल, जिवंत काडतुसे
-‘तुझं कुठं लफडं आहे का?’; शाळेत शिक्षक देत होता मुली पटवण्याचे धडे
-प्रसाद तामदार भोंदूच्या आश्रमात सापडली ‘त्या’ गोळ्यांची पाकिटं, गोळ्या नेमक्या कोणासाठी?