पुणे : कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या पुणे शहरात सध्या भाजपचाच बोलबाला पहायला मिळत आहे. अशातच पुणे शहर हळूहळू भाजपचा बालेकिल्ला बनत चालले आहे. या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते आणि कार्यकर्ते असे मत व्यक्त करत आहेत की, ‘जर भाजपचा हा गड भेदायचा असेल, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत शरद पवार यांनीही एकत्र येणे गरजेचे आहे.’
२०१७ च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर लढत प्रचंड यश मिळवले होते. त्यावेळी भाजपला १०० नगरसेवक मिळाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४० जागांसह दुसरे स्थान मिळाले आहे. शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी फक्त १० जागांवर समाधान मानावे लागले. या विजयासह भाजपने राष्ट्रवादीच्या हातातील महापालिकेची सत्ता हिसकावून घेतली आहे.
यंदा पुणे महापालिकेची सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत पुण्यातील भाजपची ताकद वाढल्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पुण्यात मोठा विजय मिळवला. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीतही पुण्यातील सहापैकी सहा जागा जिंकल्या. यामुळे भाजपच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते खालच्या स्तरावरील कार्यकर्त्यांपर्यंत, पुणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याबाबत एकमत आहे. महायुतीतील सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी करत असल्याचे दिसत आहे.
अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांना दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र येण्याची गरज वाटते. काही नेते हेच मत उघडपणे मांडताना दिसत आहे. तर काही खासगीत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करताना दिसत आहेत. अशातच पुण्यात लावण्यात आलेल्या काही बॅनर्सची देखील चांगलीच चर्चा रंगली.
राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष करण गायकवाड यांनी लावलेल्या बॅनरवर अजित पवार आणि शरद पवार यांचे एकत्रित फोटो आहेत. त्यावर “पुणे महानगरपालिका आपल्याकडे हवी असेल, तर हे दोघे एकत्र हवेत” असा मजकूर आहे.निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आपल्या विजयाची खात्री हवी आहे. त्यामुळे भाजपसारख्या बलाढ्य पक्षाशी टक्कर देण्यासाठी जास्तीत जास्त ताकद एकवटण्याच्या दृष्टिकोनातून, दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र यावे, अशी मागणी काही कार्यकर्ते करताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
-शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्वाची बैठक; पदाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना
-‘सिंहगडा’वर मोठी कारवाई; आजपर्यंतच्या इतिहासात कधीच घडलं नाही असं ५ दिवसांत घडलं
-पालिका निवडणुकीची तयारी, पुण्यात राज ठाकरेंनी बोलावली बैठक, मनसे काय निर्णय घेणार?