पुणे : लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी दाखल खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जामिनावर सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. शुक्रवारी पुणे न्यायालयात सादर केलेल्या अर्जात, राहुल गांधी वारंवार सुनावणीच्या तारखा मागत असल्याने त्यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली. जामिनाच्या अटींचे उल्लंघन होत असल्याने त्यांचा मुचलका जप्त करावा आणि न्यायालयात त्यांची हजेरी सुनिश्चित करावी, असेही अर्जात नमूद आहे.
राहुल गांधी जाणीवपूर्वक आपली याचिका नोंदविण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी केला आहे. यामुळे खटल्याच्या सुनावणीला अडथळा निर्माण होत असून, वारंवार तारखा मागितल्याने प्रक्रिया रखडत आहे. राहुल गांधी यांना न्यायालयाने सुनावणीला स्थगिती न मागणे आणि प्रत्येक तारखेला वकिलांची हजेरी यासारख्या अटींसह जामीन मंजूर केला होता. मात्र, या अटींचे पालन न झाल्याचा दावा करत सावरकर यांच्या वकिलांनी हा अर्ज दाखल केला आहे. यावर राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार २८ मे २०२५ रोजी आपले म्हणणे मांडणार आहेत.
या खटल्यासंदर्भात सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी राहुल गांधी यांच्या वकिलांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘माझी जन्मठेप’ आणि ‘हिंदुत्व’ या पुस्तकांचे मराठी व इंग्रजी भाषांतर, तसेच राहुल गांधी यांच्या वादग्रस्त भाषणाचा पेन ड्राइव्ह न्यायालयात सुपूर्द केला आहे. राहुल गांधी यांच्या वकिलांनी हे साहित्य मागितले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ मे २०२५ रोजी होणार आहे, ज्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्वाचे निर्णय; राज्यात बड्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या कॅन्सल
-भारत-पाक युद्ध झालं तर पुणे टार्गेटवर; नेमकं काय कारण?
-भारत-पाकिस्तान युद्ध: पुण्यावर काय परिणाम? शहराबाहेर जाण्याचा प्लान करण्याआधी हे वाचाच…
-‘यापुढे कोणत्याही प्रकारचा हल्ला खपवून घेतला जाणार नाही’; भारताचा पाकला इशारा