पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सूरज शुक्ला नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याने हातात कोयता घेऊन पुतळ्याचे मुंडके उडवण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार, तो पुतळ्याची विटंबना करण्याच्या उद्देशाने आला होता. सध्या पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत.
ही घटना रविवारी रात्री घडली. सूरज शुक्लाने रेल्वे स्थानक परिसरात गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि नंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जाऊन विटंबना करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडे धारदार कोयता होता. मात्र, त्याने पुतळ्याचे नुकसान करण्यापूर्वीच रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस अधिकारी सध्या त्याची चौकशी करत असून, या घटनेचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सूरज शुक्ला मूळचा उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील आहे. तो कुंभमेळा संपल्यानंतर महाराष्ट्रात आला आणि वाई येथून पुण्यात पोहोचला. तो धार्मिक पुस्तके आणि रुद्राक्ष विकण्याचे काम करतो, अशी माहिती पोलिसांनी दिली. Pत्याच्याकडे काही धार्मिक पुस्तके आढळली असून, त्याने वाई येथून कोयता विकत घेतल्याचेही पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या घटनेनंतर पुणे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याला दुग्धाभिषेक करून निषेध व्यक्त केला. यावेळी अरविंद शिंदे, कमल व्यवहारे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रकरणामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, “मागील १२ वर्षांच्या कालावधीत भाजप सरकारकडून समाजात तेढ निर्माण करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्या बाबत सांगायचे झाल्यास काही दिवसापूर्वी भाजप राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनचे नामांतर करण्यात यावे, हे कशाचे उदाहरण आहे. यातून समाजात केवळ तेढ निर्माण करणे हाच उद्देश आहे. पण हा उद्देश देशातील जनता कधीही पूर्ण होऊ देणार नाही. पुणे स्टेशन नामांतराची चर्चा थांबत नाही तोवर काल रात्री भगवे वस्त्र परिधान करून सुरज शुक्ला या तरुणाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. या विटंबनाच्या घटनेमधून भाजप समाजाला काय संदेश देऊ पाहते, यामुळे आम्ही आज निषेध नोंदवित असून पुतळ्याला दुग्धभिषेक घातला आहे. पण या प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून यापुढील काळात अशा घटना होणार नाहीत”, अशी मागणी अरविंद शिंदे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
-कोंढवा प्रकरणाला वेगळंच वळण; ‘त्या’ प्रोफेसरच्या सांगण्यावरुन तरुणीने तक्रार केली
-हिंजवडीत 3-4 दिवस वीजपुरवठा विस्कळीत; आयटी कंपन्यांचं मोठं नुकसान
-राजकीय फायद्यासाठी हे कुटुंब एकत्र आलंय का? चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल
-‘विठ्ठला, सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे’, एकादशीच्या दिवशी बच्चू कडूंचा टोला
-आई-बापच बनले सौदागर; ४० दिवसांच्या लेकराचा लाखो रुपयांना केला सौदा