पुणे : एकीकडे सर्व राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तर दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून रंगलेल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेला सध्या तरी ब्रेक लागल्याचे पहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नुकतीच एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना माहिती देताना स्पष्ट केले की, १० जून रोजी होणारा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पक्ष स्वतंत्रपणे साजरा करणार आहे. त्याचवेळी, अजित पवार यांच्या गटानेही पुण्यातच वर्धापन दिन साजरा करण्याचे ठरवले आहे.
दोन्ही गटांचे कार्यक्रम एकाच शहरात होणार असल्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता वाढली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला पक्षाचे आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असून, पक्ष आपली ताकद दाखवण्याची तयारी करत आहे. या मेळाव्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती ठरवली जाणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
दुसरीकडे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बालेवाडी स्टेडियम येथे वर्धापन दिनाचा सोहळा आयोजित केला आहे. दोन्ही गट स्वतंत्रपणे आपापली ताकद दाखवण्याच्या तयारीत असल्याने पुण्यातील या एकाच दिवशी होणाऱ्या कार्यक्रमांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
-‘सिंहगडा’वर मोठी कारवाई; आजपर्यंतच्या इतिहासात कधीच घडलं नाही असं ५ दिवसांत घडलं
-पालिका निवडणुकीची तयारी, पुण्यात राज ठाकरेंनी बोलावली बैठक, मनसे काय निर्णय घेणार?
-पुण्यात प्रभाग रचना बदलली जाणार, कशी असणार नवीन रचना? आज येणार महत्त्वाची अपडेट
-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; गुरुवारी शहरातील ‘या’ भागात पाणी पुरवठा बंद
-शरद पवारांबद्दल गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य; अखेर न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता