पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरुन राज्याच्या राजकाणात अनेक वावड्या उठल्या होत्या. अशातच आता माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
“अजितदादा, मी जे बोलतो ते खरं ठरत असतं. अशोकराव चव्हाण यांना मी तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होताल असे सांगितले होते आणि ते झाले. मी केंद्रात मंत्री होतो तेव्हा दिल्लीच्या सेंट्रल हाॅलमध्ये नेहमी राजकारणावर चर्चा होत होत्या. आजही त्या होतात, तिथे माझे जे मित्र आहेत, त्यांनी मला असे सांगितले आहे, की येत्या दीड वर्षात देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीत घेऊन जाणार आहेत. त्यानंतर राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून तुमच्यावर सोपवले जाणार आहे. त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला अॅडव्हान्समध्ये शुभेच्छा, असे म्हणत भास्कर पाटील खतगावकर यांनी अजित पवारांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
“राज्यात धडाडीचं नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. मी शरद पवार, शंकरराव चव्हाण, सुधाकरराव नाईक यांच्यासोबत काम केलं, पण तुमच्यासारखी ऊर्जा, प्रशासनावरील पकड, विषयाचा अभ्यास आणि १८ तास काम करण्याची क्षमता मी कोणाकडेही पाहिली नाही” अशा शब्दांत खतगावकरांनी अजित पवारांच्या कार्यक्षमतेची प्रशंसा केल्याचे पहायला मिळाले.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील चव्हाण वाडी येथे शेषराव चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्व नेते आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमात अजित पवार यांच्या नेतृत्वगुणांचा गौरव करत खतगावकर यांनी त्यांना राज्याच्या भविष्यातील नेतृत्वासाठी शुभेच्छा दिल्या.
महत्वाच्या बातम्या
-पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या अनधिकृत कृत्यांविरुद्ध; जिल्हाधिकारी जितेंद्र डु्डींचा इशारा
-राहुल गांधी यांचा जामीन रद्द करा; सात्यकी सावरकरांच्या वकिलांची मागणी
-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्वाचे निर्णय; राज्यात बड्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या कॅन्सल