पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पाठवला असून, तो स्वीकारण्याची विनंती केली आहे. मानकर यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याचा गुन्हा समर्थ पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या प्रकरणामुळे त्यांची आणि पक्षाची बदनामी होत असल्याचे कारण देत त्यांनी आपला राजीनामा वरिष्ठांकडे सोपवला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून आपली राजकीय बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मानकरांनी केला आहे. मानकर यांनी आपल्या राजीनामा पत्रामध्ये विरोधकांवर आरोप केल्याचे पहायला मिळाले आहे.
काय आहे राजीनामा पत्रात?
“माझा वाढता राजकीय आलेख पाहता काही समाजकंटकांकडून त्यांची बदनामी केली जात आहे. मी काही वर्षांपूर्वी केलेल्या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात आता 3-4 दिवसांपूर्वी या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात शासनाची फसवणूक केली असल्याचा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु हा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. सदर गुन्ह्यातील सत्यता न पडताळता येणाऱ्या महानगपालिका निवडणूक तसेच माझे राजकीय कारकीर्द मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.”
“सदर आर्थिक व्यवहार हा माझ्या जमिनीसंदर्भात झालेला असून त्यामध्ये माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा फसवणुकीचा प्रकार झालेला नाही. या प्रकरणामुळे आपल्या पक्षाची व आपली नाहक बदनामी होत असून त्यामुळे पक्षश्रेष्ठींना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे.”
“आदरणीय दादा, आपण आणि प्रदेशाध्यक्ष खा.श्री.सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद कायम ठेवण्यासाठी मी अध्यक्ष झाल्यापासून प्रामाणिक प्रयत्न करीत आलेलो आहे. तरी आपणास नम्र विनंती करतो की, माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर करण्यात यावा.”
नेमकं काय प्रकरण?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे माजी राज्य उपाध्यक्ष शंतनू कुकडे यांना बलात्काराच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी अटक केली होती. या तपासादरम्यान शंतनू कुकडे आणि दीपक मानकर यांच्यात एक कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी मानकर यांना चौकशीसाठी बोलावले असता, त्यांनी कोणताही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा करत काही कागदपत्रे सादर केली. मात्र, ती कागदपत्रे बनावट असल्याचे तपासात आढळून आले. त्यामुळे मानकर यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व घडामोडींमुळे मानकर यांनी पक्षाच्या हितासाठी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आता पक्षाकडून त्यांचा राजीनामा स्वीकारला जातो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
-गजा मारणेची ढाब्यावरची मटण पार्टी पोलिसांना पडली महागात; ३ पोलिसांचे निलंबन, नेमकं काय प्रकरण?
-SSC Result: महापालिकेची हायटेक शाळा; राखली शंभर टक्के निकालाची परंपरा!
-शरद पवारांच्या नेत्यांनी पोस्टर लावत घातली साद; चर्चा झाल्यानंतर काही तासांतच पोस्टर अचानक गायब
-पुणेकरांनो घरातून बाहेर पडताना छत्री, रेनकोट विसरू नका, शहराला यलो अलर्ट जारी