पुणे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले होते. मात्र, या घटनेनंतर पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय खदीजा शहाबुद्दीन शेख या तरुणीने सोशल मीडियावर पाकिस्तान समर्थक पोस्ट शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिला अटक केली होती. या प्रकरणी तिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२, १९६, १९७, २९९, ३५२ आणि ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खदीजा ही सिंहगड अकादमी ऑफ इंजिनिअरिंग या विनाअनुदानित महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. तिच्या या कृत्यानंतर महाविद्यालयाने तात्काळ कारवाई करत तिला कॉलेजमधून काढून टाकले होते. या कारवाईमुळे तिचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आल्याने खतीजाने आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिने वकील फरहाना शहा यांच्यामार्फत याचिका दाखल करून महाविद्यालयाचा निर्णय मनमानी आणि बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. या याचिकेत तिने महाविद्यालयाने केलेली कारवाई रद्द करून तिला पुन्हा प्रवेश देण्याची मागणी केली आहे.
याचिकेत काय म्हणाली खतीजा?
“महाविद्यालयाने तिला काढून टाकण्याचा निर्णय मनमानी आणि बेकायदेशीर आहे. तिने २४ मे २०२५ पासून सुरू होणाऱ्या सत्र परीक्षेला बसण्याची परवानगी मिळावी आणि तिला महाविद्यालयात पुन्हा सामावून घ्यावे”, अशी विनंती केली आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट ही फक्त पुन्हा प्रसिद्ध केलेली होती आणि तिचा कोणताही वाईट हेतू नव्हता. चूक लक्षात येताच तिने ती पोस्ट हटवली आणि याबाबत सार्वजनिक माफीही मागितली होती, असा दावा खदीजाने याचिकेमध्ये केला आहे.
या प्रकरणाने पुणे शहरात खळबळ माजवली असून, सोशल मीडियाच्या गैरवापरावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.खदीजाच्या कृत्याला काहींनी देशद्रोहासारखे गंभीर कृत्य मानले, तर काहींनी तिची ही चूक अनवधानाने झाल्याचा दावा करत तिला शिक्षणाची संधी देण्याची मागणी केली आहे. उच्च न्यायालयात दाखल केलेली ही याचिका आता या प्रकरणाला नवीन वळण देणारी ठरेल. खतीजाला पुन्हा महाविद्यालयात प्रवेश मिळेल की तिची याचिका फेटाळली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
-महिन्यात एक नाही दोन नाही तर तब्बल २५ पुरुषांशी केलं लग्न, अखेर ‘त्या’ रात्री पितळ उघड पडलंच
-काँग्रेसमधून आलेल्या धंगेकरांची शिवसेनेत बढती; एकनाथ शिंदेंनी सोपवली मोठी जबाबदारी
-भुजबळ मंत्रिमंडळात! भाजपचा राजकीय डाव की अजितदादांचा नाईलाज?
-शरद मोहोळच्या खूनाचा बदला घेण्याचा प्लॅन फिस्कटला; पोलिसांनी ‘त्या’ सराईताला ठोकल्या बेड्या