पुणे : हिंजवडी परिसरात रविवार सायंकाळपासून वीजपुरवठा खंडित झाला असून मोठ्या आयटी कंपन्यांचे चांगलेच नुकसान होत आहे. हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी 3 ते 4 दिवस लागणार असल्याची शक्यता महावितरण विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. रविवारी दुपारी 2:10 वाजेच्या सुमारास महापारेषण कंपनीच्या 220 केव्ही इन्फोसिस ते 220 केव्ही पेगासस अतिउच्चदाब भूमिगत वीजवाहिनीत बिघाड झाला.
महावितरणच्या एमआयडीसी आणि आयटी पार्क परिसरातील 91 उच्चदाब आणि सुमारे 12,000 लघुदाब वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु आयटी कंपन्यांना आवश्यक तेवढी वीज मिळत नाही आहे.
महापारेषणने नियोजित देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवला होता. याबाबतची सूचना वृत्तपत्रांमध्येही प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा सुरू करताना दुपारी 2:10 वाजेच्या सुमारास अतिउच्चदाब वीजवाहिनीत मोठा बिघाड झाला. यामुळे 22 केव्हीच्या 25 वाहिन्या, इन्फोसिस आणि नेक्सट्रा या दोन अतिउच्चदाब ग्राहकांसह एकूण 91 उच्चदाब आणि सुमारे 12 हजार लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.
महावितरण पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. सुमारे 63 मेगावॅटहून अधिक भार इतर मार्गाने वळवण्याचे काम सुरू आहे. याचा परिणाम हिंजवडीतील एमआयडीसी, आयटी पार्क, रायसोनी पार्क, डॉहलर कंपनी आणि विप्रो सर्कल परिसरावर झाला आहे. महावितरणने ग्राहकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पुढील 3 ते 4 दिवस वीजपुरवठा असाच विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
-राजकीय फायद्यासाठी हे कुटुंब एकत्र आलंय का? चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल
-‘विठ्ठला, सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे’, एकादशीच्या दिवशी बच्चू कडूंचा टोला
-आई-बापच बनले सौदागर; ४० दिवसांच्या लेकराचा लाखो रुपयांना केला सौदा
-एकनाथ शिंदेंच्या ‘जय गुजरात’च्या घोषणेवर फडणवीसांनी केली पाठराखण तर अजित पवार म्हणाले, ‘मला…’
-पुण्यातील डिलिव्हरी बॉय अत्याचार प्रकरणी मोठी ट्वीस्ट; आरोपी निघाला पडितीचा मित्र