पुणे :पुण्याचा गणेशोत्सव हा केवळ शहरापुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. हा उत्सव आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांनुसार, डीजेमुक्त स्वरूपात साजरा व्हावा, यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. डीजेचा वापर करणाऱ्या गणेश मंडळांना यापुढे जाहिरात स्वरूपातील आर्थिक साह्य दिले जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी ‘समर्थ प्रतिष्ठान’च्या ढोल-ताशा पथकाच्या वाद्य पूजन कार्यक्रमात मांडली. या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला १३२ वर्षांहून अधिकचा समृद्ध इतिहास आहे. स्वातंत्र्य चळवळीत लोकमान्य टिळक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी जनतेला एकत्र आणण्यासाठी या उत्सवाची सुरुवात केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही या उत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना मिळाली. मात्र, अलीकडच्या काळात काही मंडळे मोठमोठ्या स्पीकर्सद्वारे अश्लील गाणी वाजवून उत्सव साजरा करताना दिसतात, ज्यामुळे गणेशोत्सवाच्या पावित्र्याला आणि सांस्कृतिक वैभवाला धक्का पोहोचतो. यावर उपाय म्हणून डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची गरज बालन यांनी अधोरेखित केली.
गणेश मंडळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक संस्था जाहिरात स्वरूपात साह्य करतात. परंतु, गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि सांस्कृतिक वैभव टिकवण्यासाठी डीजे आणि अश्लील गाण्यांचा वापर टाळणे आवश्यक आहे, असे बालन यांनी स्पष्ट केले. हिंदू देवतांचा हा उत्सव धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीनेच साजरा व्हावा, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. या निर्णयाचे समाजातील सर्वच स्तरांतून स्वागत होत असून, यामुळे गणेशोत्सव पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात साजरा होण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
-अघटीत घडलं! पुणे पोलीस दलात धक्कादायक घडलं
-‘महाराष्ट्रात आलात तर चपलेचा प्रसाद नक्की मिळेल’; रुपाली पाटलांचा निशिकांत दुबेंवर निशाणा
-परप्रांतीयाकडून विटंबना; काँग्रेसकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक
-कोंढवा प्रकरणाला वेगळंच वळण; ‘त्या’ प्रोफेसरच्या सांगण्यावरुन तरुणीने तक्रार केली
-हिंजवडीत 3-4 दिवस वीजपुरवठा विस्कळीत; आयटी कंपन्यांचं मोठं नुकसान