पुणे : पुणे शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून लावण्यात आलेल्या बॅनरमुळे राज्याच्या राजकारणात चांगलेच पडसाद उमटले. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर शहरात डेक्कन चौकात शरद पवार गटाकडून बॅनर लावण्यात आला होता. सकाळी या बॅनरची चांगलीच चर्चा झाली. मात्र काही वेळातच हा बॅनर गायब झाल्याचे पहायला मिळाले आहे.
बॅनरवर काय मजकूर?
“सुप्रिया ताई साहेबांची इच्छा पूर्ण करा. साहेबांनी संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार तुमच्यावर सोपवले आहेत. लवकरात लवकर निर्णय घेऊन अजितदादा आणि आपण पुन्हा एक कुटुंब होऊया. संपूर्ण महाराष्ट्र आपण एकत्र येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे,” असा मजकूर लिहिण्यात आला आहे. तसेच या बॅनरवर सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचा एकत्रित फोटो लावण्यात आलेला. हा फ्लेक्स राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष विनायक गायकवाड यांनी लावला होता.
गेल्या काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत वक्तव्य केलं होतं. “दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळे अजित पवारांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. मी आता यामध्ये सक्रीय नाही. आमच्या पक्षातील काही नेते अजित पवारांसोबत सत्तेत जाण्यासाठी आग्रही आहेत, तर काहींचा याला नकार आहे”, शरद पवारांच्या याच वाक्तव्यावरुन राज्याच्या राजकाणात मोठा ट्विस्ट आला होता. यानंतर अनेक नेत्यांनी यावर मत व्यक्त केलं.
मात्र, आज पुण्यात लावलेल्या बॅनरमुळे पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र येणार का? शरद पवारांच्या पक्षामध्ये दोन्ही बाजूची मते असणाऱ्या नेते, पदाधिकाऱ्यांचं एकमत होणार का? हे पाहणं अवध्या महाराष्ट्रासाठी महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
-पुणेकरांनो घरातून बाहेर पडताना छत्री, रेनकोट विसरू नका, शहराला यलो अलर्ट जारी
-लाडक्या लेकीच हुशार! दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी
-पुण्यात आरटीओची मोठी कारवाई; ३४ हजार बेशिस्त वाहनचालकांना दणका, लाखो रूपयांचा दंड वसूल