पुणे : शिक्षणाला वयाचं, परिस्थीतीचं कशाचंच बंधन नसतं, हे वाक्य सत्यात उतरवलंय पुण्यातील कात्रज परिसरातील स्वच्छता कर्माचारी असणाऱ्या प्रियांका कांबळे यांनी. घराघरातून कचरा उचलण्याचं कष्टाचं काम, मुलाची जबाबदारी, वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतार – या साऱ्यांशी दोन हात करत त्या दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.दहावीच्या परीक्षेत ४७.६० टक्के गुण मिळवून त्या उत्तीर्ण झाल्या असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूल सेवासदन येथे त्यांनी शिक्षण घेतलं.
प्रियंका यांनी आपल्या जीवनातील आव्हानांवर मात करत शिक्षणाचा मार्ग निवडला. मिळालेल्या यशानंतर “माझ्या आणि पतीमध्ये मतभेद झाल्याने मी मुलासह माहेरी राहायला आले. आयुष्यातील एका टप्प्यावर सर्व काही बदलून गेले. तेव्हा वाटले की, आता स्वतःसाठी काहीतरी करायला हवे. शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही हे समजल्यावर मी पुन्हा शिकायचे ठरवले. आज दहावीचा निकाल पाहून खूप आनंद झाला आहे.” प्रियंका यांनी आपल्या जिद्दीने शिक्षण पूर्ण करून स्वावलंबी होण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
या शाळेच्या मुख्याध्यापिका नीलम खोमणे यांनी प्रियंका यांच्या यशाचे कौतुक केले. “आमची शाळा शिक्षणाची दुसरी संधी शोधणाऱ्या महिलांसाठी आशेचा किरण आहे. इथे ५ वी ते १० वी पर्यंतच्या प्रौढ विद्यार्थिनी शासनमान्य अभ्यासक्रमानुसार शिक्षण घेतात. दहावी उत्तीर्ण झाल्यावर अनेक जणी व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. प्रियंका यांचे हे यश आमच्या शाळेसाठी अभिमानाची बाब आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापिका नीलम खोमणे यांनी दिली आहे.
प्रियंका यांच्या या यशाने इतर महिलांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला सक्षम बनवण्याचा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रोत्साहनाचा स्रोत ठरला आहे. शाळेच्या प्रयत्नांमुळे अशा अनेक महिलांना शिक्षणाची संधी मिळत असून, त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत.
महत्वाच्या बातम्या
-फक्त नावालाच स्पा, बाप-लेकाचा बाणेरमध्ये वेश्या धंदा, पोलिसांनी टाकले दंडुके
-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपक मानकरांनी दिला शहराध्यक्षपदाचा राजीनामा; पत्रात नेमकं काय म्हणाले?
-गजा मारणेची ढाब्यावरची मटण पार्टी पोलिसांना पडली महागात; ३ पोलिसांचे निलंबन, नेमकं काय प्रकरण?
-SSC Result: महापालिकेची हायटेक शाळा; राखली शंभर टक्के निकालाची परंपरा!
-शरद पवारांच्या नेत्यांनी पोस्टर लावत घातली साद; चर्चा झाल्यानंतर काही तासांतच पोस्टर अचानक गायब