पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पक्षांतर्गत समन्वयाचा अभाव आणि कार्यपद्धतीवरून वाद उफाळला. 22 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या नियोजनासाठी बोलावलेली ही बैठक पुणे शहर युवती आघाडीच्या पदनियुक्तीवरून गाजली. नवीन नियुक्तीमुळे जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली, आणि हा वाद इतका टोकाला गेला की, अजित पवारांना स्वतः हस्तक्षेप करून तोडगा काढण्यासाठी बैठक घ्यावी लागली.
माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवारांनी पूर्व पुण्यासाठी सुनील टिंगरे आणि पश्चिम पुण्यासाठी सुभाष जगताप यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली. स्थानिक नेत्यांनी शहर कार्यकारिणी बदलण्याची मागणी केली असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकारिणी बदलण्यास पक्षाने नकार दिला. नवीन सदस्यांना केवळ कार्यकारिणीत सामावून घेण्याचे आणि कार्यपद्धतीत बदल न करण्याचे निर्देश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले.
राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांनी नम्रता बोनदर यांची पुणे शहर युवती पूर्व शहराध्यक्षपदी नियुक्ती केली. मात्र, ही नियुक्ती करताना स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप झाला. ‘थेट नियुक्ती ही पक्षाची अधिकृत पद्धत नाही,’ असा आक्षेप घेत काही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. या वादामुळे संध्या सोनवणे यांच्या निर्णयाविरोधात नाराज पदाधिकाऱ्यांनी थेट अजित पवारांची भेट घेण्याचा निर्णय घेतला, जिथे वादग्रस्त नियुक्ती आणि युवती आघाडीची जुनी कार्यकारिणी विसर्जित करण्याचे मुद्दे मांडले जाणार आहेत.
या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. अजित पवार या वादावर काय तोडगा काढतात आणि पक्षांतर्गत एकता कशी साधतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्यातील या घटनेने पक्षाच्या अंतर्गत कार्यपद्धती आणि समन्वयाच्या मुद्द्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
-विठुरायाच्या पंढरीत १०८ रुग्णवाहिकेद्वारे हजारो भाविकांची आरोग्यसेवा
-डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार; आता डिजे लावणाऱ्या गणेश मंडळांना…
-अघटीत घडलं! पुणे पोलीस दलात धक्कादायक घडलं
-‘महाराष्ट्रात आलात तर चपलेचा प्रसाद नक्की मिळेल’; रुपाली पाटलांचा निशिकांत दुबेंवर निशाणा
-परप्रांतीयाकडून विटंबना; काँग्रेसकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक