पुणे : वैष्णवी हगवणे…गेल्या ३-४ दिवसांपासून वैष्णवीचं नावं अनेकदा ऐकलं असेल. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूची बातमी व्हायरल झाली आणि संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली. पुण्यातील हगवणे कुटुंबाने वैष्णवी हगवणे हिला इतका त्रास दिला की तिला जगण्यापेक्षा मृत्यूचाच पर्याय अधिक सोपा वाटला. तिच्या मृत्यूनंतर समोर आलेली कहाणी अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आहे, ज्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. वैष्णवी ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची लहान सून होती. सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक जाचाला कंटाळून तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या बावधन पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना यापूर्वीच अटक केली होती. आता पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि मोठा दीर सुशील हगवणे यांनाही अटक केली आहे. या घटनेने हगवणे कुटुंबाच्या वर्तनावर आणि त्यांच्या कृतींवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे, ज्यामुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे.
करिश्मा हगवणेच्या इंस्टाग्राम प्रोफाइलनुसार, करिश्मा एक फॅशन डिझायनर आहे. तिचा ‘लक्ष्मीतारा’ नावाचा एक ब्रँड आहे. रिपोर्टनुसार, तिचे दुकान कोथरुडमध्ये आहे. तिच्या इंस्टाग्राम पेजवर, तिने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.
वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी हगवणेनेही या कुटुंबाविरोधात गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितलं की, घरातील सर्व निर्णय करिश्मा उर्फ पिंकी ताई घ्यायच्या. मयुरीच्या मते, करिश्माचं कुटुंबातील वर्चस्व इतकं होतं की तिच्या इशाऱ्याशिवाय काहीही घडत नसे. यासंदर्भात काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये करिश्मा काही प्रमुख राजकीय नेत्यांसोबत दिसत आहे, ज्यामुळे तिच्या प्रभावाबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये करिश्माचे काही राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचं दिसतं. या पोस्टमध्ये एक व्हिडिओही आहे, ज्यामध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार करिश्मासोबत दिसत आहेत. या सर्व घडामोडींमुळे हगवणे कुटुंब आणि त्यांच्या राजकीय संबंधांवर प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकरणाचा अधिक तपास होणं गरजेचं आहे.
महत्वाच्या बातम्या
-वैष्णवी हगवणे: हगवणेंचं कोणीही वकिलपत्र घेऊ नका; रोहिणी खडसेंचं आवाहन
-हगवणे कुटुंबात ढवळाढवळ करणारा, प्रत्येक वादात नाव असणारा निलेश चव्हाण नेमका कोण?
-पुणे पुन्हा हादरलं; हगवणे प्रकरण ताजं असतानाच २२ वर्षीय तरुणीचा हुंडाबळी