पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एका विवाहितेने हुंड्याच्या छळाला कंटाळून आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हडपसर परिसरातील सातववाडी येथे राहणाऱ्या दीपा उर्फ देवकी प्रसाद पुजारी (वय २२) या तरुणीने सोमवारी, १९ मे २०२५ रोजी राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं. तिच्या पतीसह सासरच्या नातेवाइकांनी सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दीपाचे वडील गुरुसंगप्पा म्यागेरी (वय ५३, रा. कर्नाटक) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी सांगितले की, दीपा आणि प्रसाद पुजारी यांचा काही महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नात दीपाच्या कुटुंबाने चार तोळे सोने आणि सुमारे १० लाख रुपयांचा मानपान करत थाटामाटात विवाह उरकला होता. मात्र, सासरच्या मंडळींनी “हुंडा कमी दिला, तसेच व्यवस्थित मानपान झाला नाही,” असे टोमणे मारत दीपाचा छळ सुरू केला. या सततच्या छळाला कंटाळून दीपाने टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा तिच्या वडिलांनी केला आहे.
दीपाच्या आत्महत्येची माहिती मिळताच तिचे वडील गुरुसंगप्पा पुजारी कर्नाटकहून पुण्यात दाखल झाले. त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पती प्रसाद चंद्रकांत पुजारी, सासू सुरेखा पुजारी, सासरे चंद्रकांत पुजारी आणि दीर प्रसन्ना पुजारी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी या सर्वांविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायदा, आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, दीपाच्या मृत्यूच्या कारणांचा सखोल तपास सुरू असून, सर्व आरोपींची चौकशी केली जाणार आहे.
नेमकं काय घडलं?
सोमवारी पुजारी कुटुंबाकडून दीपाच्या वडिलांच्या नातेवाईकाला फोन करण्यात आला की दीपा आणि तिच्या पतीचे थोडे वाद झाले आहेत त्या दोघांनी विष घेतले आहे. तुम्ही तातडीने पुण्याला या मात्र अर्ध्या रस्त्यात आल्यावर त्यांना पुन्हा फोन आला की दीपाचा मृत्यू झाला आहे. घाबरलेल्या आई-वडिलांनी थेट पुणे गाठल सुरुवातीला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांनी चौकशी केली मात्र तिथे दीपाचा मृतदेह नव्हता ना पुजारी कुटुंबाचा कोणी सदस्य होता. त्यानंतर दीपाचे कुटुंब हे मिलिटरीच्या हॉस्पिटलमध्ये गेले करायला दीपाचे सासरे हे निवृत्त आर्मी ऑफिसर आहेत. तिथे त्यांना दीपा मृत अवस्थेत दिसली. पण यात धक्कादायक बाब अशी होती. की दीपाला तशाच मृत अवस्थेत सोडून पुजारी कुटुंब तिथून पसार झालं होतं. दोन दिवस उलटले असले तरी अद्याप या प्रकरणात एकाही आरोपीला अटक नाही.
या घटनेने हडपसर परिसरात खळबळ उडाली असून, हुंड्यासारख्या सामाजिक समस्येवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. दीपाच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. गुरुसंगप्पा यांनी सांगितले की, त्यांनी मुलीच्या सुखी संसारासाठी सर्व काही केले, पण सासरच्या मंडळींच्या लोभामुळे त्यांच्या मुलीचा जीव गेला. या प्रकरणाने पुण्यातील हुंडा आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या समस्येवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्थानिकांनीही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तीव्र केला असून, दीपाच्या मृत्यूपूर्वीच्या परिस्थितीचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. दीपाच्या आत्महत्येमागे नेमके कोणते कारण होते आणि सासरच्या मंडळींनी तिला किती प्रमाणात छळले, याचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेने वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर पुन्हा एकदा हुंड्यासाठी होणाऱ्या छळाचा मुद्दा चर्चेत आला आहे. समाजात हुंडा प्रथेविरुद्ध जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. आता पोलिस या प्रकरणात कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
-अन् वैष्णवीचं बाळ आजी-आजोबांकडं पोहचलं…अजितदादांच्या दोन महिला नेत्यांनी केली मोहीम फत्ते
-वैष्णवी हगवणे प्रकरणी अजितदादांनी अखेर उचललं पाऊल; राजेंद्र हगवणेंवर केली ‘ही’ मोठी कारवाई
-चिमुकली टीव्ही बघायला गेली अन् नराधम शेजाऱ्याने संधी साधली, शेजारधर्माला काळिमा फासणारी घटना