पुणे : राज्यातील शालेय शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधातील आंदोलनामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांमध्ये सूर जुळल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोबत युती केल्यास मनसेला किती फायदा होईल, याचा अंदाज घेण्यासाठी मनसे सर्वेक्षण करणार आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालानंतरच युतीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेने राजकीय वातावरण तापले आहे. दोन्ही पक्ष आपापली राजकीय ओळख टिकवण्यासाठी झटत असताना, मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र लढल्यास मराठी मतांचे विभाजन टाळता येईल आणि त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होईल, अशी शक्यता आहे.
मुंबई महापालिकेत युतीचा काही प्रमाणात फायदा होऊ शकतो, परंतु पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील इतर महापालिकांमध्ये युतीचा किती लाभ होईल, याबाबत मनसेच्या स्थानिक नेत्यांमध्ये साशंकता आहे. त्यामुळे मनसे युतीबाबत घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी सर्व पर्यायांचा अभ्यास करणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांपैकी कोणासोबत युती फायदेशीर ठरेल, याचा विचार मनसे करणार आहे.
मुंबईत मराठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आल्यास फायदा होऊ शकतो. मात्र, हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात दोन्ही पक्षांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे हिंदी भाषिक मतांचा गठ्ठा त्यांच्याविरोधात जाऊ शकतो, अशी चिंता मनसेच्या काही नेत्यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर, मनसे युतीच्या फायद्या-तोट्यांचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन निर्णय घेणार आहे. लवकरच कोणासोबत युती फायदेशीर ठरेल, याबाबत सर्वेक्षण केले जाणार असून, त्याचा अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर केला जाईल. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांवर आधारितच युतीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मनसेच्या स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
-भोंदू बाबाचं आणखी एक सत्य समोर; भक्तांना निर्वस्त्र झोपायला लावायचा अन्….
-महाराष्ट्र हादरला: पंढरीला चाललेल्या वारकऱ्यांची लूट, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना
-स्वारगेट प्रकरणी मोठी अपडेट, दत्ता गाडेला जामीन मिळाला?
-पुण्यात इराणी देशाचे झेंडे अन् अली खामेनींचे फ्लेक्स, नेमका काय प्रकार?
-प्रभाग रचनेवर भाजप आमदारांचा प्रभाव?; पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितलं काय होतंय?