पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोणत्याही ठिकाणी जायचं म्हटलं तरी वेळेच्या आधीच हजर असतात. राजकीय कामे असो, कोणते कार्यक्रम किंवा मग आपल्या मतदारसंघातील दौऱ्यावर असताना विकास कामांची पाहणी अजित पवार नेहमी भल्या पहाटे उठून कामांची पाहणी करत असतात. तसेच ते आपल्या भाषणांतून देखील नेहमी सांगत असतात की, सर्वांना लवकर उठायची सवय असावी. अशातच आता अजित पवारांनी आज सकाळी वेळेआधी पुण्यातील नवीन इमारतीचे उद्घाटन केल्याने भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांची चिडचिड झाल्याचे पहायला मिळाले आहे.
अजित पवारांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे आज सकाळी साडे सहा वाजण्याआधीच कामाला सुरवात केली. मात्र, कार्यक्रमाची वेळ ही साडे सहा होती. भाजप नेत्या आणि खासदार मेधा कुलकर्णी या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच पालकमंत्री अजित पवार यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले होते. त्यामुळे मेधा कुलकर्णींनी चिडचिड केल्याचे पहायला मिळाले. विशेष बाब म्हणजे मेधा कुलकर्णी या वेळेच्या १० मिनिटे आधीच पोहचल्या होत्या मात्र अजित पवारांनी ठरलेल्या वेळेच्या २० मिनिटे आधीच उद्घाटन केल्याचे पहायला मिळाले आहे.
मेधा कुलकर्णींनी अजित पवारांना विचारले असता अजित पवार म्हणाले की, मला काय माहिती तुम्ही येणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या सर्व गोंधळानंतर मेधा कुलकर्णींनी माध्यमांशी संवाद साधताना वेळेत पोहचणं ठिक आहे पण वेळे आधीच असे महत्वाचे कार्यक्रम उरकणं हे योग्य नाही त्यामुळे अजितदादांनी वेळेआधी कोणतेही कार्यक्रम उरकून घेऊ नयेत, अशी विनंती केल्याचे पहायला मिळाले आहे.
त्यानंतर सकाळी ७:१० वाजता अजित पवार यांच्या उपस्थितीत बहुप्रतिक्षित सिंहगड रोड वरील उड्डाणपुलाचे उद्घाटन पार पडले. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप नेत्या आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे उद्घाटन पार पडले आहे. यावेळी अजित पवार यांनी उड्डाणपूलाच्या कामाची माहिती घेतली. या पुलामुळे राजाराम पूल ते वडगावकडे जाणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. २०२१ मध्ये या पूलाचे भूमीपूजन झाले होते. ६१ कोटींचा खर्च करुन १०६ गर्डर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे आज अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर आता हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
-PMRDA: हजारो शेतकऱ्यांची फसवणूक अन् ३ हजार कोटींचा घोटाळा? विकास आराखड्याचे गौडबंगाल काय?
-पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…
-सुरेश कलमाडींना क्लीन चीट मिळताच कार्यकर्त्यांचा पुण्यात जल्लोष; कॉमनवेल्थ घोटाळा नेमकं काय प्रकरण?
-पुण्यात बनावट नोटांचं रॅकेट! पोलिसांनी जप्त केल्या लाखोंच्या बनावट नोटा