पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्था डोळ्यासमोर ठेवून सर्व पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरुन मोठा गदारोळ सुरु आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे सोपवला आहे. दीपक मानकर यांच्यावर पोलिसांना बनावट कागदपत्र सादर केल्याबाबत गुन्हा दाखल झाला. “माझा वाढता राजकीय आलेख पाहता, काही समाजकंटकाकडून माझी राजकीय बदनामी केली जात” असल्याचा आरोप करत त्यांनी आपला राजीनामा पक्षांच्या वरिष्ठांकडे सोपवला. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे शहराचा नवा कारभारी कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर आता पक्षातील काही नावे सध्या शहराध्यक्ष पदासाठी चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
पुढील चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शहरातील नेतृत्व बदलण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महापालिकेची चांगली जाण असणाऱ्या नेत्याची शहराध्यक्षपदी निवड करण्याचा टफ कॉल अजित पवारांना घ्यावा लागणार आहे.
दीपक मानकर यांनी राजीनामा कर दिला आहे मात्र, राजीनाम्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना मानकर यांचा राजीनामा स्वीकारू नका अशी देखील मागणी केली आहे. त्यामुळे आता यासंदर्भात बुधवारी मुंबईमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या नावांसह अन्य नावांची चर्चा करण्यात आली. तसेच पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांना शहराध्यक्षपदी बढती द्यावी का? याबाबत देखील पक्षाने विचार केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदासाठी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आणि हडपसरमधून दुसऱ्यांदा आमदार झालेले चेतन तुपे यांचे नाव आघाडीवर आहे, तर वडगाव शेरीचे माजी आमदार आणि अजित पवारांचे निकटवर्ती सुनील टिंगरे यांचेही नाव या पदासाठी चर्चेत आहे. याशिवाय, माजी महापौर दत्ता धनकवडे आणि माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांच्या नावांचाही विचार होत आहे. सुभाष जगताप यांचे नाव यापूर्वी अनेकदा चर्चेत आले असले, तरी त्यांना अद्याप संधी मिळालेली नाही, त्यामुळे यंदा त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक समीकरणांचा विचार करून शहराध्यक्षपदाची निवड होणार असून, अजित पवार कोणाला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
-Local body Election: इच्छुकांची धाकधूक वाढवणारी बातमी, निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला महत्वाचे आदेश
-आधी सफरचंद आता ड्राय फ्रुट्स: तुर्कीच्या जर्दाळू आणि हेजलनट आयातीवर बहिष्कार
-SSC: शिक्षणाला कशाचंच बंधन नसतं; कचरा वेचणाऱ्या प्रियंका कांबळे दहावीत उत्तीर्ण
-फक्त नावालाच स्पा, बाप-लेकाचा बाणेरमध्ये वेश्या धंदा, पोलिसांनी टाकले दंडुके