पुणे : सध्या लग्नाच्या नावाखाली फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. यामध्ये महिलांचीच नाही तर पुरुषांची देखील मोठी फसवणूक करणाऱ्या टोळ्या देखील आहेत. अशातच आता भोपाळमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. लग्नाच्या नावाखाली पुरुषांची फसवणूक करणाऱ्या आणि त्यांना लुटणाऱ्या एका २३ वर्षीय महिलेला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. अनुराधा पासवान असे तिचे नाव असून, तिने गेल्या सात महिन्यांत तब्बल २५ पुरुषांशी लग्न करून त्यांना लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सवाई माधोपूर पोलिसांनी सोमवारी, १९ मे २०२५ रोजी भोपाळ येथून तिला ताब्यात घेतले. पोलिसांनी तिला ‘लुटेरी दुल्हन’ असे संबोधले असून, ती एका मोठ्या विवाह रॅकेटचा भाग असल्याचे उघड झाले आहे. अनुराधा लग्नाच्या नावाखाली फसवणूक करण्यासाठी सुनियोजित पद्धतीने काम करायची. ती स्वतःला गरीब आणि बेसहारा मुलगी असल्याचं सांगायची सादर करायची आणि लग्नासाठी उत्सुक असलेल्या पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढायची. तिच्या साथीदारांद्वारे व्हाट्स अॅपवर संभाव्य वरांना तिचे फोटो आणि प्रोफाइल पाठवले जायचे.
तेथील स्थानिक दलाल २ ते ५ लाख रुपये घेऊन लग्नाचा सौदा पक्का करायचे. कायदेशीर कागदपत्रांचा वापर करून ती लग्न करायची, काही दिवस सासरी राहायची आणि मग रात्रीच्या अंधारात सोने, रोख रक्कम आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन पळून जायची, असे मानटाउन पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी मीठालाल यांनी सांगितले.
या प्रकरणाचा खुलासा सवाई माधोपूर येथील विष्णू शर्मा यांनी ३ मे २०२५ रोजी तक्रार दाखल केल्यानंतर झाला. विष्णूने दलाल पप्पू मीणा आणि सुनिता यादव यांना २ लाख रुपये देऊन अनुराधाशी लग्न केले होते. २० एप्रिल २०२५ रोजी स्थानिक कोर्टात त्यांचा विवाह झाला, पण २ मे रोजी अनुराधा मौल्यवान वस्तू घेऊन फरार झाली. अनुराधा भोपाळमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी जाल रचून तिला बोगस ग्राहक बनून अटक केली. तिच्या साथीदारांचा शोध सुरू असून, या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.
अनुराधा मूळची उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील आहे. ती पूर्वी तिथल्या एका रुग्णालयात काम करायची, पण कौटुंबिक कलहानंतर ती पतीपासून वेगळी झाली आणि भोपाळला आली. तिथे ती या फसवणूक रॅकेटमध्ये सामील झाली. सध्या तिच्याविरुद्ध सवाई माधोपूरच्या मानटाउन पोलीस ठाण्यात एकच गुन्हा दाखल आहे, पण तिने २५ पुरुषांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या घटनेने विवाहाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, पोलिसांनी अशा रॅकेट्सविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-काँग्रेसमधून आलेल्या धंगेकरांची शिवसेनेत बढती; एकनाथ शिंदेंनी सोपवली मोठी जबाबदारी
-भुजबळ मंत्रिमंडळात! भाजपचा राजकीय डाव की अजितदादांचा नाईलाज?
-शरद मोहोळच्या खूनाचा बदला घेण्याचा प्लॅन फिस्कटला; पोलिसांनी ‘त्या’ सराईताला ठोकल्या बेड्या
-भुजबळांना मंत्रिपद, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा काही थांबेना; नेमकं काय राजकारण?