पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी मोठी घडामोड घडली. सभापती दिलीप काळभोर यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे (ग्रामीण) यांच्याकडे सुपूर्द केला. हा राजीनामा त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतर आला असून, यामुळे राजकीय आणि सहकारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. काळभोर यांच्या राजीनाम्यामुळे नवीन सभापती कोण होणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. या निर्णयामागील कारणे आणि पुढील नेतृत्वाबाबत उत्सुकता वाढली आहे.
एप्रिल 2023 मध्ये झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. भाजपच्या पाठबळावर राष्ट्रवादीतील बंडखोरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला पराभूत करत बाजार समितीवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. आता काळभोर यांच्या राजीनाम्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत भाजपसोबत असल्याने अजित पवार समर्थकांच्या आशा पुन्हा पेटल्या आहेत. सभापतिपदासाठी नवीन चेहरा कोण असेल, याकडे पुणे आणि परिसरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राजीनामा देण्यापूर्वी काळभोर यांनी भाजप नेते आणि बाजार समितीच्या संचालक मंडळासमवेत बैठक केली. या बैठकीला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद, माजी सभापती प्रकाश जगताप, संचालक रोहिदास उंद्रे, राजाराम कांचन, प्रशांत काळभोर, रामकृष्ण सातव, सुदर्शन चौधरी यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते. या चर्चेनंतर काळभोर यांनी राजीनामा दिला. बाजार समितीची वार्षिक उलाढाल पाच ते सात हजार कोटी रुपये असल्याने, सभापतिपदासाठी चुरस वाढली आहे.
सध्या सभापतिपदासाठी प्रकाश जगताप, रोहिदास उंद्रे आणि राजाराम कांचन यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी प्रकाश जगताप आणि राजाराम कांचन हे अजित पवार यांचे समर्थक मानले जातात, तर रोहिदास उंद्रे हे भाजपचे उमेदवार आहेत. विश्वसनीय सूत्रांनुसार, प्रकाश जगताप यांचे नाव सध्या आघाडीवर आहे आणि भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांचा त्यांना पाठिंबा आहे. भाजप आपल्या कार्यकर्त्याला सभापतिपद देणार की अजित पवार यांच्या समर्थकाला संधी देणार, याबाबतचा निर्णय लवकरच स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
-विठुरायाच्या पंढरीत १०८ रुग्णवाहिकेद्वारे हजारो भाविकांची आरोग्यसेवा
-डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार; आता डिजे लावणाऱ्या गणेश मंडळांना…