पुणे : गणेशोत्सव म्हटला की पुण्याची संस्कृती, परंपरा आणि ढोल-ताशांचा दणदणाट हे अविभाज्य समीकरण. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना शहरातील विविध ढोल-ताशा पथकांनी सरावाला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर सुमारे ८०० वादकांचा सहभाग असलेल्या नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या सरावाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या दिमाखात पार पडला.
केवळ संस्कृती जपण्यापुरतेच मर्यादित न राहता सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपत नादब्रह्म ट्रस्टने यावेळी विविध सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांची मने जिंकली. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मदतीचा हात पुढे करत गोपटे प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ५५ हजारांचे शैक्षणिक साहित्य, संघर्ष अभ्यास केंद्रासाठी ११ हजारांची आर्थिक मदत, तसेच हृदयात दरेकर यांच्या उपचारासाठी परदेशातून आवश्यक इंजेक्शन आणण्यासाठी २१ हजारांची मदत देण्यात आली.
ढोल-ताशांच्या गजरातून पुण्याची सांस्कृतिक परंपरा जपत असतानाच समाजाप्रती असलेली बांधिलकी कृतीतून सिद्ध करणाऱ्या नादब्रह्म ट्रस्टच्या या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले. संस्कृती आणि समाजसेवेचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.
या कार्यक्रमाला कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, नगरसेवक देवेंद्र वडके, श्रीकांत जगताप, प्रसन्न जगताप, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, नितीन पंडित, संजय मते, मधुरा बेलके, जागृती कुलकर्णी यांच्यासह सर्व वादक उपस्थित होते.














