मुंबई : आज विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती, मार्गदर्शक तत्त्वे आणि अडचणींचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत. बैठकीत आयोगाच्या कार्यपद्धती, सेवा प्रमाणीकरण प्रक्रिया, अंतर्गत अडचणी आणि अंमलबजावणीच्या स्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. तसेच, आयोगाकडून अपेक्षित सुधारणा आणि कार्यक्षमतेसंदर्भातही चर्चा होणार आहे.
दुपारी १२ वाजता महिला हक्कांसाठी कार्यरत सामाजिक कार्यकर्त्यांशी थेट संवाद सत्र आयोजित करण्यात आले आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर मागील काही दिवसांत महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, यासंदर्भात विविध मते व्यक्त झाली आहेत. या चर्चेत महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यांना या बैठकीसाठी विशेष निमंत्रण देण्यात आले आहे, जेणेकरून त्यांचे अनुभव आणि सूचना आयोगाच्या सुधारणेसाठी उपयुक्त ठरतील.
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्य महिला आयोगावर झालेल्या टीकेमुळे महाविकास आघाडीच्या (मविआ) महिला नेत्यांचे शिष्टमंडळ आज दुपारी १२ वाजता राज्यपालांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर, रोहिणी खडसे आणि खासदार वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ महिला असुरक्षा, हिंसाचार आणि आयोगाच्या कथित हलगर्जीपणावर चर्चा करणार आहे. राज्यपालांच्या भेटीमध्ये महिला आयोगावर अराजकीय व्यक्तीची नियुक्ती आणि नव्या अध्यक्षाची निवड यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणाने महिला हक्क आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणले आहे. त्यामुळे या बैठकी आणि शिष्टमंडळाच्या भेटीमुळे आयोगाच्या कार्यपद्धतीत सुधारणा आणि प्रभावी अंमलबजावणीबाबत ठोस पावले उचलली जाण्याची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
-बाप तालुक्याचा उपाध्यक्ष, बायको सरपंच, राष्ट्रवादीचा पदाधिकारीच निघाला अट्टल सायबर चोर
-वैष्णवीच्या वडिलांना २ कोटी मागायला लावणारा ‘तो’ बांधकाम व्यावसायिक कोण?